बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल ही कला चळवळ त्यातील महान कलावंत, कलासमीक्षक, रसिक आणि शासन अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे देशातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाली. पण, तशाच प्रकारची बॉम्बे स्कूल कलापरंपरेतील बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल कला चळवळ ही आपल्या खेकडा संस्कृतीमुळे अज्ञात राहिली. कलासंग्रह जतनाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी रविवारी वास्तवावर बोट ठेवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चित्रसंग्रहाचे काय झाले? हा संग्रह इंग्लंडला परत घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली होती. त्यासाठी ते पैैसे द्यायला तयार होते. मात्र, आम्ही सडवत ठेवून या चित्रसंग्रहाचा बट्ट्याबोळ केला आहे, असेही बहुळकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने सुहास बहुळकर लिखित ‘कलेतील भारतीयत्वाची चळवळ : द बाॅम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ आणि ‘आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर’ या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डाॅ. सुचेता भिडे चापेकर यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार व कला अभ्यासक डाॅ. श्रीकांत प्रधान, कलासमीक्षक दीपक घारे आणि सेंटरचे प्रमोद काळे या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने ‘सुहास बहुळकरांचे इतर उद्योग’ या विषयावर मंगेश नारायणराव काळे आणि डाॅ. नितीन हडप यांनी बहुळकर यांच्याशी संवाद साधला. त्याप्रसंगी बहुळकर बोलत होते.
हेही वाचा >>>पुणेकरांनी अनुभवले वाहनमुक्त रस्ते !; लक्ष्मी रस्त्यावर पादचाऱ्यांचे राज्य
बहुळकर म्हणाले, आपल्याकडे कलेचे दस्तावेजीकरण झालेले नाही. जे. जे. कला महाविद्यालयाच्या कलात्मक इतिहासाचे लेखन झालेले नाही. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या चरित्रांमध्ये विनायक करमरकर आणि वासुदेव गायतोंडे यांचा अपवाद वगळता वगळता किती मराठी चित्रकारांची चरित्रे प्रसिद्ध झाली? याचे कारण आमचे शिक्षक कलेवर प्रेम करायला शिकविण्यात कमी पडतात. उसनेगिरी करून चमकणे सोपे आहे. पण, सर्जनशील वृत्तीने काम करणे अवघड आहे.
राजा केळकर संग्रहालयाच्या मस्तानी महालातील भित्तिचित्र करण्याची जबाबदारी बाबुराव सडवेलकर यांनी माझ्यावर सोपविली होती. त्या कामामुळे मी मराठा चित्रशैलीकडे वळलो. कोणताही चष्मा लावून पाहू नये हे संस्कार झाले. त्यामुळे डावे-उजवे असा शिक्का मारत नाही. देश बघायचा म्हणून १९९५ मध्ये नोकरी सोडली. नानाजी देशमुख यांनी चित्रकूट येथे रामकथेवर प्रकल्प करायचे काम माझ्यावर सोपविताना ‘सामान्य लोकांसाठी कलेचा उपयोग करणार की नाही’ असे विचारले होते, या आठवणींना बहुळकर यांनी उजाळा दिला.