ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची टीका

पुणे : ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटामध्ये ज्येष्ठ गायिका गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन करणारे चित्रीकरण करण्यात आले आहे, अशा शब्दांत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी चित्रपटावर टीका केली आहे.

हिराबाई बडोदेकर या भीमसेनजी, वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठय़ा होत्या. त्या या सगळ्यांना मातृस्थानी आणि गुरुस्थानीच होत्या. हिराबाईंचे घर सर्वासाठी स्वरमंदिर होते.  अत्रे यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे.

डॉ. अत्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  लोकप्रिय व्यक्तींवर चित्रण करताना केवळ तीच व्यक्ती नव्हे तर अन्य व्यक्तींसंबंधातही जबाबदारीने शोध कार्य करणे आवश्यक असते. भाई चित्रपटामुळे नको असलेला संदेश लोकांपर्यंत जातो आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. एरव्ही ही माणसंही आपल्याप्रमाणेच सामान्य असतात. सामान्य असूनही ही माणसं असामान्य कार्य करतात, हे दाखवणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून हा चित्रपट अयशस्वी तर ठरला आहेच पण त्याने अनेक प्रियजनांनाही दुखावलं आहे. भारतीय संगीत परंपरा आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगणारे, संगीतावर प्रेम करणारे आमचे रसिक श्रोते, स्वत: कलाकार, चित्रपटाचे निर्माते निर्देशक, शासन आणि चित्रपटाला प्रदर्शनाचे परवानगी देणारे मंडळ यांनी या गोष्टीची दखल घेणे जरुरीचे आहे.

Story img Loader