प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी ७७ व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
ह. मो. मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. ही त्यांची पहिली कादंबरी होती. मराठे यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. याशिवाय लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा नियतकालिकांमध्येही त्यांनी लिखाण केले. कथा, कादंबऱ्यांमधील उपरोधिक, विडंबनात्मक लेखनासाठी ते ओळखले जातात.
ह. मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपणनावाने ते साहित्यिक विश्वात ओळखले जातात. हमोंनी सुरुवातीच्या काळात कोल्हापूरच्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. त्यानंतप ते पुढे वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात स्थिरावले. १९५६ मध्ये साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात त्यांची नाटिका प्रसिद्ध झाली. हे त्यांचे पहिले साहित्य होते. मात्र साधना साहित्यिकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने त्यांना खरी प्रसिद्ध मिळाली. १९७२ मध्ये ही कादंबरी पुस्तकरुपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातदेखील आहे.
ह.मो. मराठेंची ‘काळेशार पाणी’ ही कादंबरी आधी ‘साधना’मध्ये आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ‘काळेशार पाणी’मधील काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप त्यावेळी झाला होता. ना. सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांमध्ये दोन तट पडले. त्यावेळी तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि ज्येष्ठांचा गट त्यांच्या विरोधात होता. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. साधनाचे विश्वस्त एस. एम. जोशी यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवणार असल्याचे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ‘पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ‘काळेशार पाणी’ विरोधातील खटला मागे घेतला.