जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (सोमवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो २८ वर्षांचा होता. डेबू ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून आई, मैत्रिणीचा उल्लेख आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शी दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तसा उल्लेख चिठ्ठीत आढळला आहे. असं देखील पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याने सोमाटणे फाटा या ठिकाणी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डेबू हा आयटी अभियंता असून तो सोमाटणे फाटा शिंदे वस्ती या ठिकाणी राहण्यास होता. आज सकाळपासूनच डेबू हा घराच्या बाहेर न आल्याने घरमालकिणीने संशय व्यक्त केला. फोन वरून तो बाहेर आला नसल्याची माहिती पुण्यात राहणाऱ्या भावाला दिली. भावाने तातडीने सोमाटणे फाटा गाठून दरवाजा ठोठवला. परंतु, आतून प्रतिसाद न आल्याने तळेगाव पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी डेबू हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. डेबूने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मैत्रीण, आईचा उल्लेख आहे. त्याचबरोबर काही आर्थिक देवाण- घेवाण केल्याचाही उल्लेख असून अनेकांकडे त्याचे पैसे अडकलेले होते. असं तळेगाव पोलिसांनी सांगितल आहे. त्यामुळे त्याने आर्थिक विवंचनेतूनच आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. डेबू चा मृतदेह तळेगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला आहे.