परीक्षा या विषयाने विद्यापीठाची अधिसभा शनिवारी गाजली. विद्यापीठामध्ये आणि परीक्षा विभागामध्ये पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याचे कबूल करून येत्या तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी यावेळी सांगितले.
पुणे विद्यापीठाची या वर्षीची अधिसभा झालेल्या आणि येऊ घातलेल्या परीक्षांवरून गाजली. अधिसभेचे सदस्य संतोष ढोरे यांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनामध्ये झालेल्या चुका, परीक्षांचे उशिरा निकाल लागणे, गुणपत्रके चुकीची मिळणे, पुनर्मूल्यांकनाच्या निकालातील गोंधळ अशा विविध मुद्दय़ांवर प्रश्न उपस्थित केले. परीक्षा विभागातील गोंधळ, निकालातील चुका या मुद्दय़ांवरून विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे सदस्य आणि अधिसभा सदस्य यांच्यामध्ये खडाजंगी रंगली. परीक्षा विभागामध्ये पुरेशा सुविधा नाहीत, पुरेसे मनुष्यबळ नाही अशा परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना सगळा दोष देणे योग्य नाही असे मत काही सदस्यांनी मांडले. अधिसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कुलगुरूंनी सांगितले, ‘‘विद्यापीठामध्ये मनुष्यबळ कमी आहे. एकूण जागा १२३५ आहेत त्यापैकी फक्त ८५० कर्मचारी विद्यापीठामध्ये आहेत आणि त्यातले साधारण २०० कर्मचारी हे जनगणना, निवडणुकीच्या कामासाठी बाहेर असतात. मात्र, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये परीक्षा विभागामधील सर्व पदे भरण्यात येणार आहेत. निकालाच्या आणि परीक्षेच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.’’
प्राध्यापकांनी परीक्षांच्या कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराच्या पाश्र्वभूमीवरही अधिसभेमध्ये चर्चा झाली. प्राध्यापक डॉ. अशोक कांबळे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. ‘आमचा विचार करून प्राध्यापकांनी एक पाऊल मागे घ्यावे,’ असे मत विद्यार्थी प्रतिनिधींनी यावेळी मांडले. ‘आम्हालाही मुले आहेत, आम्हाला त्यांचे नुकसान करण्याची हौस नाही. शासनाने वारंवार आमची फसवणूक केली आहे. आम्हाला सारून परीक्षा घेणे विद्यापीठाला शक्य नाही. आम्हाला बाजूला करून परीक्षा घेणे शक्य असेल, तर कधीच परीक्षांचे काम देऊ नका,’ असे मत प्रा. अरुणकुमार वळुंज यांनी मांडले.
याशिवाय गुणवत्ता सुधार योजना, अभियांत्रिकी शाखेसाठी असलेली परीक्षा पद्धत, वसतिगृहांची दुरावस्था अशा विविध विषयांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. अधिसभेचे कामकाज पुढे ढकलण्यात आले असून रविवारी विद्यापीठ प्रशासन अर्थसंकल्प मांडणार आहे.
 
विद्यापीठात स्वतंत्र आयटी सेल
पुणे विद्यापीठामध्ये विविध विभागांच्या ऑटोमेशनवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयटी सेल स्थापन करण्यात आला असून आयटी मॅनेजरची निवड करण्यात आली असल्याची घोषणा कुलगुरूंनी अधिसभेमध्ये केली.