“भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करावा,” असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा १६वा पदवी प्रदान सोहळा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूळ उपस्थित होते.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, “शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा ‘वसुधैव कुटुंबकम्’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे. पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध आहे, असं उपराष्ट्रपती नायडू यावेळी म्हणाले.

यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. समारंभात जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice president said india have brilliant education legacy from takshashila to nalanda bmh