पुणे : र्नैऋत्य मोसमी पावसाने आता विदर्भाकडे वाटचाल सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही भागांत मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला. विदर्भाच्या काही भागात सध्या पूर्वमोसमी पाऊस होत आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे. कोकणात मात्र दक्षिण भागात मोसमी पाऊस काही प्रमाणात जोर धरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मोसमी पावसाने सोमवारी मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून मराठवाडय़ाच्या बहुतांश भागांत प्रवेश केला होता. सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मोसमी पावसाच्या प्रवासाची प्रगती चांगली असली, तरी दाखल झालेल्या भागामध्ये पावसाचे प्रमाण मात्र कमी असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी मोसमी पावसाने कोणतीही प्रगती केली नसली, तरी येत्या दोन दिवसांत तो विदर्भातील काही भागात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मोसमी पावसाचा १० जूनला दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. दुसऱ्याच दिवशी ११ जूनला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रगती करीत थेट मुंबई-पुण्यापर्यंत धडक मारली. पालघर, ठाणे जिल्ह्यातही त्याने प्रवेश केला. १२ जूनला त्याचा प्रवास थांबला होता. १३ जूनला पुन्हा वेग घेत मोसमी पावसाने कोकणमधील सर्व भाग व्यापला. कोकण किनारपट्टीवरून तो थेट गुजरातमध्ये दाखल झाला. महाराष्ट्रामध्ये मराठवाडय़ातील काही भाग आणि विदर्भात त्याची प्रगती अद्याप झालेली नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राबरोबरच बंगालच्या उपसागराच्या बाजूने मोसमी पाऊस प्रगती करणार आहे. या बाजूने तो बिहापर्यंत पोहोचला असून सध्या पूर्वोत्तर भागासह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पाऊस होत आहे.

दोन दिवसांत विदर्भात प्रवेश

मोसमी पावसाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सोलापूर, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, जालना, लातूर, बीड आदी जिल्ह्यांपर्यंत मजल मारली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मराठवाडय़ातील बहुतांश भाग व्यापून तो विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता आहे.