राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या अपशब्दांनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काहीही भाष्य न केल्याने त्यांच्या नाराजीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मागील आठवडाभरापासून अजित पवार हे कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते.
अजित पवार नेमके आहेत तरी कुठे? ते का बोलत नाहीत? यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र आज अनेक दिवसांनी अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस त्यांनी मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांबद्दल सूचक भाष्य केलं.
नाराजीच्या चर्चांच्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर अजित पवारांनी खापर फोडलं. तुम्ही मध्यंतरी आजारी असल्याच्या चर्चा होत्या, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही बातम्या देतात, काहीही फालतू बातम्या देतात,” असं म्हणत अजित पवारांनी नाराजीची चर्चा चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
बेताल वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तारांसहीत इतर राजकीय घडामोडीबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.