पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) कडून केले जाणारे मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरु आहे. मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूकीची कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यात आता आणखी एक भर पडणार आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या शहरातील मेट्रोला अनोखा लूक मिळणार आहे. पगडी ही पुण्याची विशेष ओळख असून शिंदेशाही म्हणजेच मावळ्यांच्या पगडीचा थाट मेट्रो अतिशय रुबाबाने मिरवणार आहे. मेट्रोचे काही स्टेशनची रचना पगडीच्या रुपात करण्यात येणार आहे. पुण्याची संभाजीनगर आणि डेक्कन ही दोन स्टेशन्स पगडीच्या आकाराची असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या मेट्रो स्टेशन्सचा लूक पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा असेल. बालगंधर्व मेट्रो स्टेशनचं आर्किटेक्चर हे सांगितिक पार्श्वभूमीचं असेल, अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. उंचावरुन या मेट्रो स्टेशन्सची ऐतिहासिक रचना उठून दिसणार आहे. किल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या बेसाल्ट खडकाचा वापर या मेट्रो स्टेशनच्या वापरासाठी करण्यात येणार आहे. या सगळ्या मेट्रो स्टेशन्सना स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत. पुण्यातल्या पेठा, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड या ठिकाणहून हा स्कायवॉक जोडण्यात येणार आहेत.

पुणेरी पगडीच नाही, तर शहरातील विविध वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक ठिकाणे आणि वारसा स्थळांच्या (हेरिटेज) काही वैशिष्ट्यांचा आकारही ठराविक स्टेशनला देता येईल का, याबाबत आढावा घेण्यात येत आहे. काही जुन्या, पुरातन वास्तूंचे बांधकाम, त्यांचे दरवाजे, याची झलक मेट्रो स्टेशनच्या डिझाइनमध्ये निश्चित पाहायला मिळेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. पुणे मेट्रोच्या प्राधान्य मार्गावरील (पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स) नऊ स्टेशनचे डिझाइन आयेसा या कंपनीकडून केले जात आहे, तर वनाझ ते रामवाडी या मार्गावरील १२ स्टेशनचे डिझाइन एलकेटी इंजिनीअरिंग आणि हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून केले जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how metro stations look like with puneri shindeshahi pagadi
Show comments