लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: आठ वर्षांची मुलगी असलेल्या महिलेने लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या फेसबुकवरील मित्राने दोघांच्या संवादाचे व्हिडिओ युट्यूबवर शेअर केले. हा प्रकार मंगळवारी (दि.२) हिंजवडी येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सुशील आठवले (रा.सांगली) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- पुणे: डाॅक्टर महिलेचा विनयभंग; पतीला जिवे मारण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील आणि फिर्यादीची फेसबुकवरून ओळख झाली. दोघांचे फोनवर बोलणे झाले होते. आरोपीने दोघांचे फोनवर बोलल्याचे व्हिडीओ फिर्यादीच्या व्हॉटस्अपवर पाठविले. फिर्यादीने ते व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने माझ्यासोबत लग्न कर, मी व्हिडिओ डिलीट करतो असे म्हटले. त्यावर मला आठ वर्षाची मुलगी आहे. तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे फिर्यादीने सांगितले. त्यामुळे चिडलेल्या आरोपी सुशीलने दोघांचे बोलले व्हिडीओ युट्यूबवर शेअर करत फिर्यादीची बदनामी केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.