सर्व जिल्ह्य़ांमधील मतदान केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण करून मतदारांना मतदानयोग्य सुविधा देशभरामध्ये प्रथमच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ चित्रीकरणासह माहिती अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आगामी १५ ते २० दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्यामध्ये देशभरातील प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवरील सुविधांच्या पूर्ततेसंदर्भात मतदान केंद्राचे व्हिडीओ चित्रीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची वाहतूक आणि सुरक्षेसंदर्भातील दक्षता, मतदान कक्ष इमारतीच्या तळमजल्यावर असावेत, महिला आणि पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा असाव्यात, रांगेतील मतदारांसाठी शेड असावी, अपंग मतदारांना सहजपणे मतदान करता यावे यासाठी रॅम्प असावेत, मतदारांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छ शौचालये या सुविधा असल्या पाहिजेत या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर गस्त घालणाऱ्या सर्व मोबाईल युनिटसमवेत प्राथमिक उपचारांची औषधे असावीत, अशा सूचना निवडणूक आयुक्तांनी दिल्या आहेत. दृष्टिहीन मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला ब्रेल लिपीत अधोरेखित केलेली चिन्हे असावीत, असेही नमूद करण्यात आले आहे. पूर्वी या बाबींची पूर्तता ही तालुका स्तरावर करून ती माहिती जिल्हा स्तरावर क़ळविली जात होती. मात्र, या माहितीबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावरील सुविधांच्या प्रत्यक्ष पूर्ततेसंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती नूतन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्य़ातील ७ हजार ५०० मतदान केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण करून निवडणूक तयारी अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ाचा निवडणूक आराखडा तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.