पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.

देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलेले नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपत असल्याने विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णांनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला.

त्यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर मोदी, मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आले. त्यामुळे तणाव आणखी वाढला. यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.