राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापनदिनीनिमित्त पक्षांतर्गत बदल करण्यात आले. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ऐनवेळी शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला. तसंच,या निर्णयामुळे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा रंगली. अजित पवारांना कोणतंच पद न दिल्याने ते नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. परंतु, या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी त्या पुण्यात बोलत होत्या.
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत, यावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, “कोण म्हणालं ते नाराज आहेत? तुम्ही त्यांना जाऊन विचारलंत का? रिपोर्ट्समधून येणारी माहिती ही फक्त गॉसिप आहे. पण प्रत्यक्षात काय आहे? ते वेगळं आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही. हे सोपं आहे.” असं म्हणत अजित पवारांच्या नाराजीनाट्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा >> “होय, ही घराणेशाहीच, मी शरद पवार अन्…”, विरोधकांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर
पुण्यात आज त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडं असतात.”
“देशात माझा पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडिल संसदेत पास करत नाहीत. मला सातत्याने संसदरत्न मिळते, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे घराणेशाही दिसते,” अशा शब्दांत विरोधकांना सुप्रिया सुळेंनी खडसावलं आहे.