पिंपरी : दुरंगी लढत होत असलेल्या चुरशीच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाला प्रतिसाद मिळत आहे.  समाविष्ट च-होली भागात रांगा लावून मतदार मतदान करत आहेत. भोसरीत पहिल्या चार तासात १६.८३ टक्के मतदान झाले आहे.भोसरीत भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे. २००९ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्यांदा विलास लांडे अपक्ष निवडून आले.

२०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपशी घरोबा करून २०१७ मध्ये त्यांनी कमळ हाती घेतले. २०१९ मध्ये लांडगे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. आता तिसऱ्यावेळी लांडगे नशीब आजमावत आहेत. त्यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अजित गव्हाणे यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे भोसरीत चुरस निर्माण झाली आहे.भोसरीत एकूण  ६,०८,४२५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार  ३,२८,२८०, महिला मतदार २,८०, ०४८ आणि तृतीयपंथी  ९७ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी ११ वाजेपर्यंत पुरुष ६०५८२, स्त्री ४१८३८, इतर १ असे १०२४२१ जणांनी मतदान केले आहे. १६.८३ टक्के मतदान झाले आहे.