पुणे : दिवाळी सुटी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा अपुरा साठा असून, रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीतही केवळ पाच दिवसांचा साठा शिल्लक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर वर्षी दिवाळीत सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. अनेक महाविद्यालयांना दिवाळीची सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची रक्तदान शिबिरे कमी होतात. खासगी कंपन्यांतील कर्मचारीही दिवाळी सुट्यांवर जात असल्याने अशा कंपन्यांतील रक्तदान शिबिरेही कमी होतात. यामुळे दर वर्षी दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदा ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. शहरात राजकीय पक्ष आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. यंदा विधानसभा निवडणुकीमुळे ही शिबिरे कमी झाली आहेत.

हेही वाचा – ठाणे: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातून पुण्यात उपचारांसाठी रुग्ण पुण्यात येतात. शहरात सुमारे ७८० छोटी-मोठी रुग्णालये आहेत. याचबरोबर एकूण ३५ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांची संख्या मोठी असल्याने शहरात दिवसाला सुमारे दीड हजार रक्तपिशव्यांची गरज असते. सध्या यातील निम्मेच संकलन होत आहे. यामुळे रक्तपेढ्यांकडून गृहनिर्माण संस्था आणि नियमित रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. गृ़हनिर्माण संस्थांमध्ये छोटी शिबिरे आयोजित करून रक्तसंकलन केले जात आहे. याचबरोबर दिवाळी सुट्या संपल्याने खासगी कंपन्यांनाही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन रक्तपेढ्या करीत आहेत. शहरातील रक्ताची टंचाई दोन आठवड्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता रक्तपेढ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आमच्याकडे दररोज ५० ते ७० रक्तपिशव्यांची मागणी असून, सध्या ३ ते ४ दिवसांचा साठा शिल्लक आहे. सर्वसाधारणपणे आमच्याकडे १० ते १५ दिवसांचा साठा शिल्लक असतो. गेल्या आठवड्यांत नियमित रक्तदात्यांनी आम्ही केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. या आठवड्याच्या अखेरीस शनिवारी आणि रविवारी रक्तदानाचे आवाहन नियमित रक्तदात्यांना केले आहे. – डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

हेही वाचा – मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग

ससून रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा पाच दिवसांचा साठा शिल्लक आहे. दिवाळी सुटीमुळे रक्ताची मागणीही कमी होती. ती आता वाढू लागल्याने साठा कमी पडत आहे. नियमित रक्तदात्यांना आवाहन करून सध्याची गरज पूर्ण केली जात आहे. आगामी काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून रक्तसाठा पुरेशा प्रमाणात वाढेल. – डॉ. मंगेश सागळे, प्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election pune blood shortage there is only five days of blood left in the blood banks pune print news stj 05 ssb