झगमगत्या प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीमध्ये ’अक्षर फराळा’चे महत्त्व अबाधित आहे. मराठी वाचकांची अभिरुची संपन्न करण्यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या दिवाळी अंकांच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. साहित्यविषयक अंकांच्या खरेदीला वाचकांनी प्राधान्य दिले असून शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या ‘मौज’, ‘लोकसत्ता’, ’पुण्यभूषण’ या दिवाळी अंकांना सर्वाधिक मागणी आहे. दिवाळी अंकांची उलाढाल या वर्षी १५ कोटी रुपयांची होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- पुणे: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण; शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीकडून कार्यक्रमाचे आयोजन
दिवाळी म्हटलं की लाडू, चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या, अनारसे, शेव असा फराळ डोळ्यासमोर येतो. पण, दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक मराठी घरामध्ये किमान एक तरी दिवाळी अंक विकत घेतला जाताे. त्यामुळेच नवोदित लेखकांना प्रस्थापित करणारे आणि मान्यवर लेखकांना आकर्षित करणाऱ्या दिवाळी अंकांची परंपरा शताब्दीनंतरही वर्धिष्णू होत आहे. कराेना संकटामध्येही दोन वर्षे दिवाळी अंकांच्या प्रथेमध्ये खंड पडला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याचा परिणाम दिवाळी अंकांच्या बाजारपेठेवर झाला आहे. वाचकांचे दिवाळी अंकांवर प्रेम असल्याने प्रत्येक घरामध्ये खरेदीबरोबरच दिवाळी अंकाच्या खरेदीसाठी निधी राखून ठेवला जातो, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी दिली.
अक्षरधाराच्या दालनामध्ये राज्यभरातील अडीचशेहून अधिक दिवाळी अंक उपलब्ध आहेत. त्यामध्ये ‘मौज’, ’लोकसत्ता’, ‘अनुभव’, ’अक्षरधारा’, ’किस्त्रीम’, ‘दीपावली’, ’अक्षर’, ‘चंद्रकांत’, ‘कालनिर्णय’, ‘संवादसेतू’, ’साधना’, ‘कालनिर्णय’, ‘हंस’ आणि ‘पद्मगंधा’ या दिवाळी अंकांना सर्वाधिक मागणी आहे. केवळ पुणे शहराला वाहिलेला असा लौकिक असलेल्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाच्या प्रती शिल्लक नाहीत.
दिवाळीमध्ये वैचारिक लेखनाबरोबरच हलकेफुलके साहित्य वाचनाची आवड जोपासली जाते. त्यामुळे ‘आवाज’, ‘जत्रा’, ‘माेहिनी’, ‘फिरकी’, ‘श्यामसुंदर’ या विनोदी अंकांना मागणी आहे. भयकथा वाङ्मय प्रकारामध्ये ‘धनंजय’, ‘नवल’, ‘थरार’, ‘हेर’ या अंकांना वाचकांची पसंती लाभत आहे. तर, महिलाविषयक दिवाळी अंकांमध्ये ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘श्री व सौ’, ‘मिळून साऱ्याजणी’ या अंकांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. दिवाळी अंकाच्या खरेदीमध्ये बालकुमारांचाही प्राधान्याने विचार केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्याच्या उद्देशातून ‘किशोर’, ‘चिकू-पिकू’, ‘पासवर्ड’, ‘साधना युवा’ यांसह या वर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या ‘कुल्फी’ आणि ‘लाडोबा’ या अंकांना मागणी आहे, अशी माहिती राठिवडेकर यांनी दिली.
हेही वाचा- Diwali 2022: लक्ष्मीपूजनासाठी ‘हा’ मुहूर्त आहे शुभ
कागदाच्या किमतीमध्ये या वर्षी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचा फटका बसला असून दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये दिवाळी अंकांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. निर्बंधमुक्तीमुळे दिवाळी अंकांची बाजारपेठ फुलली असली तरी एकूण उलाढालीमध्ये अंकांच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचाही समावेश असेल, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरी संचालक रमेश राठिवडेकर यांनी दिली.
हेही वाचा- पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
डेक्कन जिमखान्यावरील बुकगंगा दालनामध्ये दिवाळी अंक खरेदीला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. बहुतांश दिवाळी अंक बाजारामध्ये आले असून दसऱ्यापासून आतापर्यंत दिवाळी अंकांच्या एक हजारांहून अधिक प्रतींची खरेदी वाचकांनी केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता दालनामध्ये येणारे वाचक हे प्रामुख्याने दिवाळी अंकांचीच खरेदी करत आहेत, अशी माहिती बुकगंगा पुस्तक दालनाचे व्यवस्थापक कुमार देवणे यांनी दिली.