पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

‘विद्यावाणी’ १०७.४ एफएम या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘कम्युनिटी रेडिओ’वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आता लवकरच मोबाइलवरही ऐकता येणार आहेत. त्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांना अन्य व्यावसायिक एफएम रेडिओप्रमाणेच तपपूर्ती साजरी करणाऱ्या विद्यावाणीच्या कार्यक्रमांचा आनंद लुटता येणार आहे.

पुणे विद्यापीठातील ‘विद्यावाणी’ हे एफएम रेडिओ केंद्र कार्यान्वित झाले त्याला रविवारी (११ जून) १२ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ जून २००५ रोजी तत्कालीन राज्यपाल आणि कुलपती एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते विद्यावाणी एफएम रेडिओ केंद्राचे उद्घाटन झाले होते. विद्यापीठापासून ८ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात या रेडिओ केंद्राचे कार्यक्रम ऐकू जात होते. अशा प्रकारचे एफएम रेडिओ केंद्र सर्वप्रथम सुरू करण्याचा बहुमान पुणे विद्यापीठाने पटकाविला होता. आता विद्यावाणीचे कार्यक्रम थेट मोबाइलवर प्रसारित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यामुळे पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

विद्यावाणी एफएम रेडिओ केंद्राचे कार्यक्रम नीटपणे ऐकू येत नाहीत अशी तक्रार होती. काही तांत्रिक कारणांमुळे कार्यक्रमांचे प्रक्षेपण स्पष्टपणे ऐकता येत नव्हते. मात्र, त्यावर मात करीत पाच वर्षांपूर्वी विद्यावाणीच्या कार्यक्रमांचे इंटरनेटवरून थेट प्रसारण करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे केवळ शहरातीलच नव्हे, तर जगभरातील श्रोत्यांसाठी विद्यावाणीच्या कार्यक्रमांचे दालन खुले झाले. प्रत्येकाजवळ संगणक आणि इंटरनेट असेल असे नाही. मात्र, आता विद्यार्थ्यांसह नागरिकांकडेही अत्याधुनिक स्वरूपाचे मोबाइल असतात. या मोबाइलमध्ये इंटरनेटही असतात. विद्यावाणीच्या कार्यक्रमांचा आनंद आता सर्वाना आपापल्या मोबाइलवरही घेता येणार आहे, अशी माहिती विद्यावाणीचे संचालक आनंद देशमुख यांनी दिली.

विद्यावाणीच्या कार्यक्रमांचे प्रसारण करणारा ट्रान्समिटींग टॉवर लवकरच दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. नवे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी मान्यता दिल्यानंतर हा टॉवर योग्य ठिकाणी बसविण्यात येईल. त्यानंतर ३० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात विद्यावाणीच्या कार्यक्रमांचे प्रसारण करता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमांच्या श्रवणाची स्पष्टताही उच्च दर्जाची असेल. विद्यावाणी वाहिनीचा ‘डीएव्हीपी’मध्ये (डिपार्टमेंट ऑफ ऑडिओ-व्हिज्युअल पब्लिसिटी) समावेश झाला आहे. त्यामुळे या वाहिनीला ‘स्वच्छ भारत अभियान’सह केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या जाहिराती मिळू लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात वाहिनीला दहा लाख रुपयांहून अधिक रकमेच्या जाहिराती मिळाल्या असून आता लवकरच राज्य सरकारच्या विविध योजनांच्या जाहिराती मिळतील, असे देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader