पिंपरी महापालिकेतील शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे दिला आहे. लोखंडे यांची सभापतीपदाची मुदत १३ जुलैला पूर्ण झाल्यामुळे नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण मंडळाच्या बरखास्तीच्या निर्णयास स्थगिती मिळाल्याने आता नव्या सभापतपिंदाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
लोखंडे यांची वर्षभराची वादग्रस्त कारकीर्द पूर्ण झाली. तेव्हा दुसऱ्यास संधी द्यायची असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यानुसार, लोखंडे यांनी पक्षनेत्यांकडे राजीनामा दिला. त्यानंतर दोनच दिवसात शिक्षण मंडळ बरखास्तीचा निर्णय झाला होता. अनेक दिव्य पार पडल्यानंतर गळ्यात सदस्यपदाची माळ पडलेल्या सदस्यांना या निर्णयामुळे जमीन खचल्याचा अनुभव आला होता. सदस्यांना मंडळाच्या कार्यालयात अघोषित बंदी झाली होती. सदस्यांच्या निवासस्थानाबाहेर लागलेले नामफलकही तातडीने काढून टाकण्यात आले होते. मात्र, बरखास्तीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली. तेव्हा शासननिर्णयास स्थगिती मिळाली आणि सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोखंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, सभापतींना आणखी मुदतवाढ हवी आहे. किमान पाच सप्टेंबरचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम आपल्या अध्यक्षतेखाली व्हावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, अन्य सदस्यांचा तीव्र विरोध आहे. वर्षभरात सभापतींनी कोणालाच विश्वासात घेतले नाही. नेत्यांच्या नावाखाली खोटे बोलून रेटून कामे केली, ही सदस्यांची मुख्य तक्रार आहे. मंडळात राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत असून विरोधकांचे अस्तित्व केवळ कागदावर आहे. सर्वाना मांडवाखालून काढण्याचे नेत्यांचे नियोजन आहे. लोखंडे हे आमदार विलास लांडे समर्थक मानले जातात. त्यामुळे पुढील सभापतपिंदासाठी अन्य नेत्यांच्या समर्थकांमध्ये चुरस राहील, असे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा