पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्यासंदर्भात त्यांनी सोमवारी घोषणाच केली.‘शिवतारे कसे निवडून येतात तेच पाहतो’ असे म्हणत अजित पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना पराभवाची धूळ चारली होती.
शिवतारे म्हणाले की, पुरंदरच्या स्वाभिमानी जनतसेठी मोठमोठ्यांशी पंगा घेतला. एकच आपल्याला संदेश देतो. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई.. हेच चाललंय ना.. अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा काही कोणाचा सातबारा नाही, की सतत बारामतीचा ५० वर्ष खासदार पाहिजे. पुरंदर, इंदापूर भोरचा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा… काय मिळालं आम्हाला… विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी.. स्वाभिमानी जनतेचा अपमान केलाय.. तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणाले होते. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांना ६ लाख ८६ हजार मतदान झाले होते आणि ५ लाख ८० हजार मतदान पवार विरोधकांचे आहे. सहा लाखमध्ये दोन पवार आणि पाच लाखामध्ये एकटा विजय शिवतारे असेल. पुरंदर, भोर, इंदापूर आपल्या बाजूने असेल. ही लढाई आता आरपार लढायची असा मी निर्णय घेतला आहे, असे शिवतारे म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला किती जागा मिळतील आणि त्यामध्ये बारामतीची जागा नसेल हे डोळ्यासमोर ठेवून नणंद-भाजवय लढतीमध्ये मतविभाजनाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने शिवतारे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.