आपल्या समर्थ लेखणीतून विजय तेंडुलकर यांनी मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा बदलला, असे मत ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी व्यक्त केले.
नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘तें’ना अभिवादन करण्यात आले. डॉ. वि. भा. देशपांडे यांनी तेंडुलकरांच्या प्रतिमेचे आणि त्यांच्या साहित्यकृतीचे पूजन केले. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह वि. दा. पिगळे, उद्धव कानडे, बंडा जोशी आणि प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.
‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर
प्रयोगशीलता हा तेंडुलकरांच्या लेखनाचा स्वभाव होता, असे सांगून देशपांडे म्हणाले, नाटय़ परंपरेला छेद देताना विषय, आशय आणि आविष्कार यासंदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. भाषेतील विरामचिन्हांचा प्रभावी वापर करणारे ते एकमेव असे यशस्वी नाटककार होते. अशा थोर नाटककाराचे यथोचित स्मारक व्हायला हवे होते. तेंडुलकरांच्या नाटकांचे प्रयोग करून ज्यांनी पैसा आणि प्रसिद्धी मिळविली, त्यांनी सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे स्मारकासाठी पाठपुरावा करायला हवा. आता महाराष्ट्र साहित्य परिषद त्यासाठी पुढाकार घेत आहे ही आनंदाची बाब आहे. जोशी म्हणाले, कोणत्याही चौकटीत बसविता येणार नाहीत अशी तेंडुलकरांची नाटके हा मराठी रंगभूमीवरचा स्वतंत्र प्रकार आहे. तेंडुलकरांनी दिलेले धक्के हे केवळ समाजालाच नव्हे तर मराठी रंगभूमी परंपरेला होते. समाजातील दंभावर त्यांची नाटके प्रहार करतात. त्यांच्या यशाची तुलना करता ललित वाङ्मय क्षेत्रातील तेंडुलकरांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीकडे साहित्य विश्वाचे दुर्लक्षच झाले आहे.