थातुरमातूर संकल्पनांवर चित्रपट निर्मिती करण्यापेक्षा कला क्षेत्राने अभिजात मराठी साहित्यनिर्मितीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सोमवारी व्यक्त केली. मोठय़ा साहित्यिकांशी माझा पत्रव्यवहार आणि सहवास अशा माध्यमातून संबंध आला. मी प्रत्यक्ष साहित्याची निर्मिती करीत नसलो तरी वाचनाच्या माध्यमातून स्वत: श्रीमंत होत साहित्याची सेवा करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त विक्रम गोखले यांच्या हस्ते किसनमहाराज साखरे, प्रभा गणोरकर, दासू वैद्य, मीना किणीकर, राम म्हैसाळकर, अशोक पाटोळे यांना ग्रंथकार पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे विविध वाङ्मयप्रकारासाठीच्या वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी व्यासपीठावर होते.
पुलं, सुनीतामावशी, तेंडुलकर, खानोलकर, रणजित देसाई, कमलताई पाध्ये या ज्येष्ठ साहित्यिकांशी माझा पत्रव्यवहार होता. मला त्यांचा सहवास लाभला. या सर्वानी माझ्यासारख्या सामान्य वाचकाला खूप श्रीमंत केले आहे. माझ्याकडे चार हजार पुस्तकांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह आहे. काही लेखकांशी माझे वादही झाले आहेत. अर्थात हे वाद मैत्रीपूर्ण आणि सुसंवादाचे होते, असे सांगून विक्रम गोखले म्हणाले, आपला देश स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात धन्यता मानतो. पण, एक सुशिक्षित मुलगी थेट पदावर आली तर बरोबरच्या माणसांशीच तिचा सत्तासंघर्ष होतो. ‘रात्र वणव्याची’ या नीला सत्यनारायण यांच्या कादंबरीवर मी दूरदर्शनसाठी मालिकेचे दिग्दर्शन करीत आहे. ही एक प्रकारची माझी साहित्य सेवाच आहे.
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या घरात जन्माला आल्यामुळे मिळालेला समृद्ध वारसा एक पाऊलभराने पुढे नेऊ शकले याचा आनंद या पुरस्काराने दिला असल्याची भावना वर्षां गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केली. पर्यावरण या विषयाला आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पदर आहेत. राजकीय अनास्था आणि विकासाचे स्वीकारलेले विपरीत प्रतिमान ही पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पतीच्या अकाली निधनानंतर अंगावर पडलेली दोन लहान मुलांची जबाबदारी, एमपीएससीची दिलेली परीक्षा आणि शासकीय सेवेत काम करताना मुलांचे मिळालेले सहकार्य अशा आठवणी मित्रमंडळींच्या आग्रहास्तव लिहिल्या. त्याला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटत असल्याचे संगीता धायगुडे यांनी सांगितले. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. नंदा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
मुलीला मराठी वाचता येत नसल्याची खंत
माझी मोठी मुलगी अमेरिकेला असून ती उत्तम मराठी बोलते. मात्र, धाकटय़ा मुलीचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्याने तिला मराठी वाचता येत नाही. तिला मातृभाषा येत नाही याची खंत वाटते, असे विक्रम गोखले यांनी सांगितले. मराठीची गळचेपी होत आहे, साहित्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि मराठी शाळा बंद पडत आहेत. या संदर्भात काय करता येईल याचा विचार झाला पाहिजे. इंग्रजी माध्यमातून शिकण्यास विरोध नाही पण, किमान मराठी घरातील मुले वाचन संस्कृतीपासून दूर जाता कामा नयेत. यातून मार्ग काढला ततर साहित्य निर्मिती करणाऱ्या पूजकांच्या श्रमांचे चीज होईल, असेही गोखले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा