पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर स्पेशल ड्यूटी विभागीय आयुक्त पुणे म्हणून सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू होती. पण सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या प्रत्येक ठिकाणी वाढत असल्याने, अधिकाऱ्यांची बदली होणार नाही, अशी देखील चर्चा मागील काही दिवसापासुन ऐकण्यास मिळत होती. मात्र आज राज्यातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली. तर, पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची पुण्याचे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. तसेच साखर आयुक्त सौरभ राव यांची स्पेशल ड्यूटी विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये पुणे महापालिकेत शेखर गायकवाड येण्यापूर्वी ते साखर आयुक्त म्हणून काम पाहत होते. आता पुन्हा त्याच पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. तर त्यांच्या जागी असलेले सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची पुणे महापालिकेतून साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आता त्यांची विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
सध्या राज्य करोना सारख्या महामारीचा सामना करीत आहे. त्यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे हे सर्व अधिकारी कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.