माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी बालेकिल्ल्यात शहरातील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले, पक्षांतर्गत पाडापाडीचे राजकारण हे त्यामागचे प्रमुख कारण होते. भोसरी मतदारसंघातील पराभूत आमदार विलास लांडे यांनी आपल्या पराभवास पक्षातील नेते व नगरसेवकांना जबाबदार धरल्याने त्यास अधिकृत पुष्टी मिळाली आहे. तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बहल, आझम पानसरे यांच्यासह विरोधात काम करणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीच लांडे यांनी पक्षप्रमुख शरद पवार व अजितदादांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भोसरीत राष्ट्रवादीचे बंडखोर महेश लांडगे यांच्याकडून पराभव झालेल्या लांडे यांनी पवारांना भेटून पराभवाची कारणे सांगितली. महत्त्वाचे प्रश्न न सोडवल्याने नागरिकांमध्ये असलेली नाराजी, पक्षांतर्गत पाडापाडीचे राजकारण, नेत्यांचे चुकलेले निर्णय, नको त्यांना दिलेली ताकद असे मुद्दे लांडे यांनी दिलेल्या पत्रात ठळकपणे मांडल्याचे समजते. गेल्या लोकसभेत पराभव दिसत असतानाही शिरूरमधून निवडणूक लढवली, तेव्हा राष्ट्रवादीच्या मंडळींनी ‘बळीचा बकरा’ बनवला. त्यानंतरच्या विधानसभेत तिकीट नाकारले. अपक्षजिंकूनही पक्षासोबत निष्ठेने राहिलो. मात्र, चुकीच्या लोकांना ताकद दिली, आता तेच पक्ष फोडण्याची भाषा करत आहेत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न न सुटल्याने नागरिक राष्ट्रवादीवर नाराज होते. मात्र, तरीही पक्षाचे तिकीट घेतले. मात्र, आपल्याच मंडळींनी घात केला. आपल्याच नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार केले. ज्यांना राष्ट्रवादीने मोठे केले, त्यांनीच पक्षाचे तीन तेरा वाजवले. आझम पानसरे, योगेश बहल, मंगला कदम, भाईजान काझी, सुमन पवळे, दत्ता साने, उल्हास शेट्टी, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरूणा भालेकर, वनिता थोरात, वसंत लोंढे, शुभांगी लोंढे, संतोष लोंढे, सुनीता गवळी, नितीन काळजे, एकनाथ थोरात, संतोष कवडे, पांडुरंग गवळी, रामदास कुंभार, बबन बोराटे, शांताताई आल्हाट, पंडीत गवळी, अलका यादव आदींनी विरोधात काम केले. पक्षात नेहमीच गद्दारांना मानाचे स्थान मिळाल्याने आजची वेळ पक्षावर आली. नगरसेवक फोडू, राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकू, अशी भाषा आपलेच नगरसेवक करू लागले आहेत. भविष्यकाळातील संभाव्य उलथापालथ रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असून गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवून प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. गेल्या वेळी पक्षाचे तीन आमदार होते. आज एकही आमदार नाही. पक्षाला गतवैभव मिळून देण्यासाठी आम्हाला व प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद द्या, असे साकडे लांडे यांनी पवारांना घातल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे तिकीट मिळत होते..
भाजपचे तिकीट आपल्यालाही मिळत होते. मात्र, पवार कुटुंबीयांवर असलेल्या प्रेमामुळेच ते नाकारले व राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. मात्र, आपल्याच मंडळींनी घात केला. संभाव्य धोके निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष न दिल्याने ही वेळ आल्याचे विलास लांडे यांनी म्हटले आहे.

भाजपचे तिकीट मिळत होते..
भाजपचे तिकीट आपल्यालाही मिळत होते. मात्र, पवार कुटुंबीयांवर असलेल्या प्रेमामुळेच ते नाकारले व राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. मात्र, आपल्याच मंडळींनी घात केला. संभाव्य धोके निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष न दिल्याने ही वेळ आल्याचे विलास लांडे यांनी म्हटले आहे.