भोसरीची महती, मंत्र्यांची खाबुगिरी, राजकारणातील दुखणी मांडताना, अपार कष्टातून मिळवलेले यशाचे गुपित सांगताना आमदार विलास लांडे यांनी स्वत:चा जीवनपटही उलगडला. वेळोवेळी तिकीट कापले गेल्याने अपक्ष म्हणून लढवलेल्या निवडणुकीत ‘छत्री’, ‘बस’ आणि ‘कपबशी’ चिन्हांचे योगदानही त्यांनी सूचकपणे मांडले.
भोसरी नाटय़गृहातील शिक्षक पुरस्कारांच्या कार्यक्रमात लांडेंनी चौफेर फटकेबाजी करून उपस्थितांची मनेजिंकली. आम्ही पुढारी कारणापुरते असतो. खोटं बोलतो, पण रेटून बोलतो. राजकारण्यांविषयी फारसे चांगले बोलले जात नसल्याचे त्यांनी खुमासदार पद्धतीने मांडले. ते म्हणाले, शिक्षकासारखे काम दुसरे कोणीच करू शकत नाही. आयुष्याच्या वाटचालीत आपण खूप भोगले, शिक्षणही अर्धवट सोडले. शिक्षक खूप मारायचे, त्यातूनच घडलो. वडील नगरसेवक होते. मिसळ-पावचे हॉटेल होते. शाळेतून आल्यानंतर तेथे बसायचो. उष्टय़ा कपबश्या धुवायचो. बडे राजकारणी तेथे यायचे, फुकट खाऊन जायचे. तेव्हा हे काय चाललयं, असा प्रश्न पडायचा. मोठ्ठ व्हायचे, असे लहानपणीच ठरवले होते. कष्ट केले, गरिबीतून वर आलो. आई लांडगे परिवारातील असल्याने आपल्या रक्तात लांडग्यांचा अंश आहे, त्यामुळेच भोसरीत टिकलो. घरचा विरोध असतानाही परमिट रूम सुरू केले, त्यासाठी तत्कालीन मंत्र्यांनी मोजून पैसे घेतले. कंपन्यांचे अधिकारी नियमितपणे हॉटेलमध्ये यायचे, त्यांच्याशी गट्टी जमली. त्याचा उपयोग पुढील काळात व्यवसायात झाला. १९९२ मध्ये नगरसेवक झालो. तिकीट नाकारल्याने ‘छत्री’ चिन्हावर निवडून आलो. त्यानंतर, एकदा ‘बस’ ने तर एकदा ‘कपबशी’नेजिंकवले. अजितदादांनी महापौर केले तर ‘साहेबांनी’ व्यवसायात मदत केली. आजमितीला कंपनीत ३५०० कामगार असून १५०० कोटींची उलाढाल आहे. शिक्षणसंस्थाही काढली. सध्या बाह्य़विद्यार्थी म्हणून द्वितीय वर्षांत शिक्षण पूर्ण करत आहे. कामाची लाज बाळगली नाही, जिद्द व सातत्य ठेवले म्हणूनच यशस्वी झालो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा