सरपंच ते मुख्यमंत्री असा  प्रवास.. वेगवेगळ्या पक्षांत राहूनही कायम टिकलेली मैत्री.. हजरजबाबीपणा आणि आस्थेने माणसे जोडण्याची कला ..अशा अनेक किश्श्यांमधून माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा रविवारी मिळाला.
मराठवाडा हितकारणी संस्था, विदर्भ हितकारणी संस्था, पश्चिम महाराष्ट्र हितकारणी संस्था, खान्देश हितकारणी संस्था आणि कोकण हितकारणी संस्था यांच्यातर्फे  आयोजित ‘आठवणीतले विलासराव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार गोपीनाथ मुंडे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार उल्हास पवार, आमदार विनायक मेटे, महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर या वेळी उपस्थित होते…. (उर्वरित वाचण्यासाठी खाली दिलेल्या आकड्यांवर क्लिक करा)
विलासरावांमुळेच राज्याचा विरोधी पक्षनेता होऊ शकलो असे सांगून मुंडे म्हणाले, ‘‘पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासूनची आमची मैत्री होती. त्यात बिब्बा घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु यश आले नाही. आम्ही निवडणुकीत एकमेकांना कधीच पाडत नसू! विलासरावांच्या रक्तात लोकशाही होती. ऐन वेळी समोरच्याला निरुत्तर करणारे, हजरजबाबीपणा आणि उत्तम वक्तृत्व त्यांच्याकडे होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवणारे विलासराव एकमेव आहेत.’’
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक नेते येतात आणि जातात, पण ज्यांची आठवण काढावी अशी व्यक्तिमत्त्व फार थोडी असतात. विलासराव त्यांपैकी होते. ते राज्यातून दिल्लीत येण्यापूर्वीच त्यांची एक लोकप्रिय आणि यशस्वी नेता अशी कीर्ती पोहोचली होती. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी मुंबईमध्ये विलासराव देशमुख वैचारिक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. उल्हास पवार या केंद्राचे अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. तरुणांमध्ये नेतृत्वगुण तयार व्हावेत यासाठी हे केंद्र काम करेल.’’ (उर्वरित वाचण्यासाठी खाली दिलेल्या आकड्यांवर क्लिक करा)
टेम्पो पकडल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे!
 सामान्य नागरिकाचा दूरध्वनी आला, तरी विलासराव त्याच्याशी आस्थेने बोलत असत, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली. बाभुळगावच्या एका टेम्पोचालकाचा दूरध्वनी एकदा त्यांना आला होता. काहीही ओळख नसताना आपला टेम्पो पकडल्याची तक्रार त्याने थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली होती! विलासरावांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतलेच पण त्याचा टेम्पो सोडण्याचे आदेशही पोलिसांना दिले. टेम्पो नेमका कोणत्या ठिकाणी पकडला आहे हे विचारण्यास देशमुख विसरून गेल्यामुळे नंतर झालेल्या शोधाशोधीत तो टेम्पो आणि टेम्पोचालक त्या दिवशी चांगलेच गाजले!