महिला बचत गटांच्या चळवळीने पुण्यात चांगला जम बसवला आहे. या गटातील महिलांनी उद्योजिका बनावं यासाठी विविध संस्था विविध उपक्रम राबवत असतात. महिला बचत गटांना बळ देण्यासाठी कात्रजला गावरान खाद्य महोत्सव भरवण्यात आला आहे आणि नावाप्रमाणेच इथलं ग्रामीण वातावरण कुणालाही भावेल असंच आहे.
वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ चाखण्याची एक चांगली संधी खवय्यांसाठी आली आहे. त्यासाठी कात्रजला जायला हवं. ही संधी दोन दिवस आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारी या संधीचा लाभ घेता येईल. कात्रजला शुक्रवारपासून गावरान खाद्य महोत्सव सुरू झाला आहे. फक्त खाद्यपदार्थाचे पन्नास स्टॉल्स या महोत्सवात लावण्यात आले आहेत.
खाद्य महोत्सव म्हटला की फक्त तिथे खायलाच जायचं असतं असं काही नाही. या महोत्सवातलं वातावरणही छान असतं. कात्रजचा खाद्य महोत्सवही असाच आहे. महिलांनी लावलेले स्टॉल, आपल्या पुढय़ातच तयार होणारे गरम गरम खाद्यपदार्थ, काही तयार खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, प्रत्येक स्टॉल समोर झालेली गर्दी असं खूप काही इथे बघायला मिळतं. मराठी पारंपरिक खाद्यपदार्थ हे या महोत्सवाचं प्रमुख वैशिष्टय़ आहे. पुणे शहराबरोबरच पुणे जिल्हय़ातून म्हणजे भोर, इंदापूर अशा वेगवेगळय़ा ठिकाणाहून आलेल्या महिलांचे स्टॉल इथे आहेत आणि परगावाहून म्हणजे अगदी नागपूरहून आलेला बचत गटही या महोत्सवात सहभागी झाला आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. चटकदार आणि आवर्जून चव घ्यावी असेच इथले सगळे पदार्थ आहेत. शिवाय वेगवेगळय़ा पदार्थाची चव चाखल्यानंतर गोड पदार्थही हवतेच. त्यासाठी मांडे, उकडीचे मोदक, रबडी, बासुंदी यांचेही स्टॉल महोत्सवात आहेत.
या महोत्सवाची खासियत म्हणजे प्रत्येक स्टॉलवर तयार होत असलेले पदार्थ. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही आधी ठरवायचं आणि ऑर्डर दिली की तुमच्या समोरच पदार्थ तयार व्हायला लागतात. मग ते मांडे असोत किंवा पुरणपोळी किंवा पिठलं भाकरी. खास चुलीवर हे पदार्थ तयार होत असतात. गरम गरम भाकरी आपल्यासमोरच तव्यावर टाकल्या जात असतात. अशा ठिकाणी पदार्थाचा आस्वाद घेण्यातली मजा काही वेगळीच असते.
गावरान खाद्य महोत्सवाचा हा उपक्रम डिसेंबर महिन्यापासून पुण्यात सुरू झालाय. या आधी वडगाव धायरी आणि नंतर वारजे अशा दोन ठिकाणी अशाच प्रकारचा खाद्य महोत्सव भरवण्यात आला होता. कात्रजचा हा तिसरा महोत्सव आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खास ग्रामीण खाद्यपदार्थाना बाजारपेठ मिळावी आणि पुणेकरांना चांगले खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मिळावी असा या महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे. ही मूळ संकल्पना खासदार सुप्रिया सुळे यांची आहे. नगरसेवक दत्ता धनकवडे, विशाल तांबे, युवराज बेलदरे यांचे आणि रूपाली चाकणकर, सोनाली डाळवाले आदींचे या उपक्रमाच्या संयोजनात साहाय्य आहे. या उपक्रमामुळे म्हणजे खाद्य महोत्सवामुळे महिलांना खाद्यपदार्थ विक्रीच्या क्षेत्रात चांगली संधी मिळत असल्याचा अनुभव आहे.
vinayak.karmarkar@expressindia.com