आशिया खंडात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सन १९९७ मध्ये समाविष्ट झालेली गावे विकासापासून अद्यापही दूरच राहिली आहेत. अपुऱ्या मूलभूत सुविधा, खड्डय़ांचे रस्ते, विकास आराखडय़ातील रखडलेली कामे अशी गावांमधील परिस्थिती आहे. गेल्या पंधरा वर्षांत या गावांमधील नागरिकांनी अनेक नगरसेवक निवडून दिले, मात्र त्यांनाही विकासकामे करता आली नसल्याने गावांमधील करदाते नागरिक विकासकामे केव्हा होतील, असा प्रश्न विचारत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये किवळे, रावेत, तळवडे, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, पुनावळे, यासह १७ गावांचा समावेश १९९७ मध्ये करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी ताथवडे गावाचा समावेश महापालिकेमध्ये झाला. परंतु १९ वर्षांच्या काळात या भागात विकासकामे झालेली नाहीत. शहरातील रस्ते मोठे व आदर्श झाल्याचे सांगून सत्ताधारी पिंपरी-चिंचवड हे विकासाचे मॉडेल असल्याच्या मोठय़ा घोषणा करतात. रस्ते मोठे असलेल्या या शहराच्या समाविष्ट गावांमधील नागरिकांना मात्र अरुंद रस्त्यांचाच वापर करावा लागत आहे. विकास आराखडय़ातील अनेक रस्त्यांची कामे या भागात झालेली नाहीत. गावांमध्ये भुयारी गटारांची कामेही अर्धवटच आहेत. त्यामुळे नागरिकांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे. रुपीनगर, तळवडे, दिघी आदी परिसराला रेडझोनच्या समस्येने घेरले आहे. वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या मुद्याचे भावनिक राजकारण करून नागरिकांना झुलवण्याचे काम केले आहे.

रेडझोनमुळे या भागातील नागरिकांच्या जागांचे व्यवहार होत नाहीत. याशिवाय कोणत्याही बँकांकडून अर्थसाहाय्य मिळत नाही. समाविष्ट गावातील आरक्षणांचा विकास झालेला नाही. रुपीनगर, चिखली, जाधववाडी, डुडुळगाव, चऱ्होली, कुदळवाडी आदी भागांमध्ये महापालिकेचे एकही उद्यान किंवा क्रीडांगण नाही. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही किंवा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र नाही. कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था

दयनीय झाली आहे. त्यामुळे पंधरा वर्षांत झालेल्या तीन निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या नागरिकांना पुन्हा तीच आश्वासने देण्यात येत आहेत.