पिंपरी: पुनावळेतील कचरा डेपोची आरक्षित जागा महापालिकेने वन विभागाकडून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू करताच स्थानिक नागरिकांनी विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी पुनावळेतील ग्रामस्थ दुचाकी रॅली काढणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज १२०० टन ओला आणि सुका कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करून मोशीतील ८१ एकर परिसरातील कचरा डेपोत टाकला जातो. परंतु, मोशी डेपोची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिकेने पुनावळेतील आरक्षित जागेवर कचरा डेपो विकसित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहर वाढत असून कचरा वाहतुकीचे अंतर जास्त आहे. पुनावळेत कचऱ्याचे डोंगर उभारले जाणार नाहीत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. बफर झोन निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.
हेही वाचा… देहूकरांच्या विरोधानंतर पोलीस आयुक्तालयासाठी आता मोशीतील गायरान जागेची चाचपणी
महापालिकेने कचरा डेपोचे आरक्षण २००८ मध्ये टाकले होते. त्यावेळी नागरिकरण कमी होते. आता पुनावळे भागात एक लाखाहून अधिक नागरिक राहतात. हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरी जवळ असल्याने नागरिक पुनावळेत वास्तव्यास प्राधान्य देतात. गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये उभारली आहेत. प्रस्तावित कचरा डेपोपासून २०० ते ४०० मीटर अंतरावर मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे प्रस्तावित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी आज सकाळी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
आरोग्याचा विचार करून प्रशासनाने नागरीकरण आणि जंगल नसलेल्या पर्यायी जागेचा शोध घ्यावा. नागरिकांना त्रास होईल, असा प्रकल्प राबवू नये. – सचिन लोंढे, स्थानिक नागरिक