पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन हजार ८३२ हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाधित होणाऱ्या सातही गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
पुरंदर येथील विमानतळासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पारगाव येथे भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मौजे पारगाव, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांतील सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असून सरकारने दुसरीकडील गायरान तसेच वनविभागाच्या जागेची निवड करावी.
शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होणार असून पाचपेक्षा अधिक दराने मोबदला दिला, तरी जमिनी देणार नाही, अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे न्यायालयीन लढा देण्यासाठी सात गावांचा ठराव करण्यात येणार आहे. तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी स्थानिका्ंकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोध सुरू झाल्याने प्रशासकीय पातळीवर स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार असल्या तरी, त्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी प्रसासनाची भूमिका आहे. त्यामुळे स्थानिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या, विरोध समजावून घेत विश्वास संपादन केला जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी