पुणे मेट्रोसाठी केंद्राच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद अपेक्षित असताना फक्त दहा कोटींची तरतूद केंद्राकडून झाल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याही पुढे जाऊन आता मेट्रोच्या तरतुदीसाठी खुद्द महापौरांनीच रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मेट्रो अभ्यासकांकडून पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत जे अनेक आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत तेही अद्याप अनुत्तरितच आहेत. मेट्रोसंबंधीचे काही महत्त्वाचे आक्षेप काय आहेत याची माहिती दिलीप भट यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. भारतीय रेल्वेच्या अधिकारी प्रशिक्षण संस्थेत भट यांनी मानद व्याख्याता म्हणून काम केले आहे.
—-
पुणे मेट्रोचा प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी गेला असताना अद्यापही पुण्यात त्याबाबत आक्षेप का घेतले जात आहेत?
मेट्रो प्रणालीला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. जलद वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो असली पाहिजे हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही. उलटपक्षी पुण्यात होत असलेल्या या प्रकल्पाचे स्वागतच आहे. मात्र जो विरोध आहे तो दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे मेट्रो प्रकल्पाचा जो सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे आणि त्या अहवालाच्या आधारे ज्या काही शिफारशी करण्यात आल्या आहेत त्यांबाबत आक्षेप आहेत.
मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्य आक्षेप काय आहेत?
मेट्रोच्या दोन मार्गाचे नियोजन पुणे आणि पिंपरीसाठी करण्यात आले आहे. त्यातील पहिला स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा आहे आणि दुसरा वनाझ ते रामवाडी असा आहे. हा दुसरा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असावा का भूमिगत असावा याबाबत आक्षेप आहेत. आणखी एक आक्षेप डीएमआरसीने सुचविलेल्या प्रणालीच्या निवडीबाबतचा आहे. डीएमआरसीच्या मापदंडाप्रमाणे प्रवासी संख्या जेथे १५ हजापर्यंत (प्रतितास-एक दिशा-एक मार्ग) आहे तेथे मेट्रो प्रणालीची आवश्यकता नाही. मार्ग क्रमांक दोन म्हणजे वनाझ ते रामवाडी या मार्गाच्या संदर्भात ही संख्या सन २०३१ साली सुमारे ११ हजार होणार आहे. याचा अर्थ या मार्गाला मेट्रो प्रणालीची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे. डीएमआरसीने नागपूरसाठी हाच मापदंड आठ हजार प्रवासी असा नमूद केला आहे आणि नागपूरसाठी लाईट मेट्रोची शिफारस केली आहे आणि प्रत्यक्षात ज्या गाडीची शिफारस केली आहे तिची क्षमता मध्यम क्षमता प्रकारात येते.
पुणे मेट्रोसाठीची शिफारस काय आहे?
पुणे मेट्रोसाठी डीएमआरसीने मध्यम क्षमतेच्या प्रणालीची शिफारस केली आहे. त्याची प्रवासी क्षमता ३० ते ५० हजार (प्रतितास-एक दिशा-एक मार्ग) आहे. याचाच अर्थ असा, की संभाव्य प्रवासी संख्येच्या पाचपट क्षमतेची प्रणाली पुणे मेट्रो प्रकल्पात लादली जाणार आहे. त्यामुळे क्षमता मोठी असलेल्या या प्रकल्पात प्रत्यक्षातील प्रवासीसंख्येचा विचार केला तर ती खूपच कमी आहे. म्हणजे तोटा होणार हे सुरुवातीलाच स्पष्ट होत आहे.
उन्नत मार्गाला विरोध का आहे?
मेट्रोच्या उन्नत मार्गावरील स्थानकाच्या उभारणीसाठी रस्त्याची न्यूनतम रुंदी ४२ ते ४५ मीटर असणे आवश्यक आहे. अशा रुंदीचे रस्ते मार्ग क्रमांक दोनमध्ये नाहीत हे आम्ही लक्षात आणून दिले होते. मेट्रो बांधकामाच्या कालावधीत रस्त्यावरील सुमारे आठ मीटर लांबीचा पट्टा वाहतुकीस उपलब्ध होत नाही. या शिवाय मार्ग पूर्ण झाल्यावर तीन मीटर रुंदीचा पट्टा वाहतुकीस बंद होतो. हैदराबादमध्ये उन्नत मेट्रो मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र तेथील रस्त्यांची रुंदी पाहिल्यानंतर तेथे तो मार्ग कसा शक्य आहे ते आपल्या लक्षात येते.
पुण्यात कोणत्या प्रणालीचा अवलंब केला जावा?
सर्वागीण व समर्पक विचार केला तर पुणे शहरासाठी हलक्या (लाईट) क्षमतेच्या प्रणालीचा अवलंब करणे सयुक्तिक ठरेल. या प्रणालीची प्रवासी क्षमता १५ ते ३० हजार (प्रतितास-एक दिशा-एक मार्ग) असते आणि या प्रणालीचा अवलंब केल्यास भूमिगत मार्गाचा खर्च मध्यम क्षमतेच्या उन्नत मार्गापेक्षा कमी होतो हेही सिद्ध झाले आहे. पुण्यातील अनेक जागरूक नागरिकांनी, डीएमआरसीने नागपूर, कोची आणि पुणे शहरासाठी केलेल्या मेट्रो प्रणाली अहवालातील अभ्यास बारकाईने केला असून त्यातील विरोधाभासही आम्ही निदर्शनास आणून दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा