‘‘आपण महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकसभेचे जागावाटप झाले होते. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवू शकलो नाही. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे सन्माननीय ठरतील इतक्या जागांची मागणी करू. आतापर्यंत शिव संग्राम संघटना सामाजिक संघटना म्हणून लढत होती, पण आता राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत निर्णय घेणार आहोत,’’ असे संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२६ मे रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात संघटनेची सर्वसाधारण सभा होणार असून त्या वेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी पक्षस्थापनेबाबत निर्णय घेतील, असेही मेटे यांनी सांगितले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठा समाजाच्या जिवावरच आजवर मते घेतली. हे लोक त्याच बळावर आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री झाले. मी मात्र मराठा समाजाचे काम करतो म्हणून त्यांच्या डोळ्यात खुपू लागले. आता माझी आमदारकी घालवायचीच म्हणून राष्ट्रवादी इरेस पेटली आहे. पण विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख हे न्यायी आहेत. ते माझ्या बाजूने न्याय करतील अशी खात्री वाटते,’ असेही ते म्हणाले.

Story img Loader