पुणे : हिमोफिलिया हा दुर्मीळ रक्तविकार असून, यात रुग्णाच्या शरीरात रक्त गोठण्याची क्रिया घडत नाही. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात आतमध्ये अथवा बाह्य भागावर सुरू झालेला रक्तप्रवाह न थांबल्यामुळे त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो. हा विकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकावर विंक्रीस्टिन या औषधाचा प्रभावी पद्धतीने वापर करण्यात आला. यामुळे अखेर रुग्णाच्या जखमेतून होणारा रक्तप्रवाह थांबविण्यात यश आले.
या रुग्णाचे वय ६० वर्षे असून, त्याला हिमोफिलिया ए हा विकार होता. त्याच्या रक्तात फॅक्टर ८ या घटकाची कमतरता होती. या रुग्णाच्या जिभेला जखम झाली होती. मात्र हिमोफिलियाचा विकार असल्याने जखमेतून रक्तप्रवाह थांबत नव्हता. त्यामुळे त्याला रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली. मात्र, रक्तप्रवाह थांबविण्यास यश आले नाही. या रुग्णाला आधी रक्तविकाराचा त्रास झालेला नव्हता. रुग्णाची स्थिती पाहून डॉक्टरांनी हिमोफिलियाचे निदान केले. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी विंक्रीस्टिन उपचारपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून आला आणि रुग्णाच्या जखमेतील रक्तप्रवाह अखेर थांबविण्यात यश आले.
हेही वाचा : बारा वर्षांच्या मुलीची लठ्ठपणापासून सुटका; बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार; वजन १०६ वरून ८६ किलो
याबाबत रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर विजय रामानन म्हणाले की, रुग्णाचे निदान आणि त्याच्यावरील उपचाराचे नियोजन करण्याचे आव्हान होते. त्यामुळे पर्यायी उपचार पद्धतींवर आम्ही विचार सुरू केला. याआधी हिमोफिलियाच्या रुग्णांवर विंक्रीस्टिन प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णावर याच पद्धतीने उपचार करण्याचा निर्णय घेतला. या उपचारामुळे रुग्णाच्या जखमेतील रक्तप्रवाह आम्ही थांबवू शकलो.
हेही वाचा : घर घेताय…? जाणून घ्या पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घरांच्या किमती किती महागल्या…
हिमोफिलिया म्हणजे काय?
हिमोफिलिया हा रक्त न गोठण्याच्या विकार आहे. एखादी जखम झाल्यानंतर त्यातून येणारे रक्त एका ठराविक वेळेनंतर थांबते. या जखमेच्या तोंडाशी रक्त गोठण्याची क्रिया घडते आणि रक्तस्त्राव थांबतो. हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये तो थांबत नाही. हा आजार संपूर्ण बरा करणारे औषधोपचार उपलब्ध नाहीत. मात्र, तो नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त औषधोपचार आहेत. ते महागडे असल्याने अनेक रुग्णांना परवडणारे नसतात. भारतात हिमोफिलियाच्या रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार असण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात केवळ २१ हजार रुग्णांची नोंद झालेली आहे.