कवी म्हणून विंदा करंदीकर मोठेच होते. पण, माणूस म्हणूनही ते मोठे होते. मी काही कवी नाही. पण, माझा त्यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. विंदांच्या नावाचा पुरस्कार हा माझा मोठा बहुमान आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी बुधवारी व्यक्त केली.
मिरासदार यांना राज्य सरकारतर्फे विंदा करंदीकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला. त्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारचे आभार मानत मिरासदार यांनी विंदांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यातील नवीन सरकार चांगले उपक्रम राबवित आहे. त्यातील हा उपक्रम माझ्या वाटय़ाला येईल असे वाटले नव्हते. माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्योत्तर काळात रविकिरण मंडळाने कवितेचा प्रसार केला. त्यानंतर गिरीश आणि यशवंत या कवींनी एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम केले होते. साठोत्तरी काळात बा. सी. मर्ढेकर यांनी सुरू केलेल्या नवकवितेच्या पर्वानंतर विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तीन कवींनी काव्यवाचनाचे कार्यक्रम करीत मराठी कविता घराघरात पोहोचविली. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मी, एकत्रित कथाकथनाची स्फूर्ती आम्ही या त्रयींकडून घेतली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांनी कवितेचा प्रसार केला त्याच धर्तीवर आम्ही कथा हा वाङ्मय प्रकार समाजामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला. कित्येकदा त्यांचे काव्यवाचन आणि आमचे कथाकथन असे एकत्रित कार्यक्रमही झालेले आहेत. हे तिघेही कवी आणि तिघे आम्ही कथाकार, आमच्यावर ‘सत्यकथा’ मासिकाचे ऋण आहे. कथाकथनाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना विंदांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा चांगला योगायोग आहे.
विंदांच्या नावाचा पुरस्कार हा बहुमानच – प्रा. द. मा. मिरासदार
कवी म्हणून विंदा करंदीकर मोठेच होते. पण, माणूस म्हणूनही ते मोठे होते. मी काही कवी नाही. पण, माझा त्यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. विंदांच्या नावाचा पुरस्कार हा माझा मोठा बहुमान आहे,
आणखी वाचा
First published on: 26-02-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinda karandikar d m mirasdar honour lifetime awards