पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नगरसेवक विनोद नढे यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार कैलास कदम यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. नढे यांनाच पदावर बसवण्याचा आटापिटा चालवलेल्या शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे ‘फिक्सिंग’ या निमित्ताने उघड झाले. तत्पूर्वी, पडद्यामागे बरेच नाटय़ही घडले.
विनोद नढे भोईरांचे निकटवर्तीय असून त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचे पूर्वीच ठरले होते. तथापि, कदम राजीनामा देत नव्हते. त्यामुळेच कदमांवर ‘माणिक अस्त्र’ चालवण्यात आले. भोईर-कदम यांच्यात शीतयुध्द सुरू होते. मात्र, समान शत्रू असल्याने ते नाईलाजाने एक असल्याचे दाखवत होते. ‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्याने कदमांचा पत्ता कट करण्याचे राजकारण झाले, त्याला भोईर यांची फूस होती, असा संशय कदम समर्थकांना वाटतो. पायउतार व्हावे लागल्याने कदम तीव्र नाराज आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यालयातील ‘खांदेपालट’ कार्यक्रमास ते गैरहजर राहिले. ‘भोईर हटाव’ मोहिमेची बीजे यानिमित्ताने रोवली गेल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वाच्या सहमतीने नढेंची निवड झाली. हे पद प्रसिध्दीसाठी नसून प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी आहे, असे सूचक विधान भोईरांनी पत्रकार परिषदेत केले. आपली निष्ठा काँग्रेसशी असून राष्ट्रवादी हाच मुख्य शत्रुपक्ष आहे. सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कामास पािठबा तर चुकीच्या निर्णयांना विरोध करण्याची भूमिका राहील, असे नढेंनी स्पष्ट केले. पालिका सभेत महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते नढेंचा सत्कार करण्यात आला.
‘कुबडय़ा आमच्या, रुबाब तुमचा कशासाठी?’
पिंपरी पालिकेत काँग्रेसचे १४ नगरसेवक असून राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या आठ अपक्षांनी काँग्रेसला पािठबा दिल्याने २२ संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. तेव्हाच अपक्षांना पदे देण्याचा शब्द दिला गेला, तो पाळला जात नाही, याकडे अपक्षांचे स्वयंभू नेते मोरेश्वर भोंडवे यांनी लक्ष वेधले व अपक्षांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा