सोशल मीडियाच्या माध्यमातून संतांवरील श्रद्धेला ठेच पोचू नये, यासाठी आमच्या पक्षाचे सरकार आल्यावर नवा सायबर कायदा आणू, असे आश्वासन भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दिले.
विनोद तावडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहल्यात सहभागी झाले होते. जेजुरी ते वाल्हे प्रवासात दौंडज खिंडीजवळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही नेते यावेळी टाल मृदंगाच्या गजरात तल्लीन झाले होते.
तावडे म्हणाले, सध्याचे राज्य सरकार वारकरयांच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे. जेजुरीजवळ एमआयडीसीची २५ एकर जमीन असतानाही पालखी तळासाठी जमीन उपलब्ध करून दिली जात नाही. सरकारमधील जो तो पैशांच्या मागे लागला आहे, असाही आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरही यावेळी उपस्थित होते.