‘‘महायुतीत सहसंवाद साधणारे कुणी उरलेले नसले तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेते या परिस्थितीतून मार्ग काढत आहेत. आम्ही एकवेळ स्वत: नुकसान सोसू, पण कुणालाही महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ येणार नाही,’’ असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केले. महायुतीच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान जागावाटप जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात ‘फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशन’ या पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेबरोबर झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.
जागावाटपाबद्दल बोलताना तावडे म्हणाले, ‘‘भाजपच्या नेत्यांच्या जागावाटपासंदर्भातील बैठका पूर्ण झाल्या आहेत, तर शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी अजून सुरू आहेत. ज्या जागा भाजप व शिवसेना सातत्याने लढतात पण जिंकू शकत नाहीत त्या जागांची अदलाबदल होऊ शकते का, याबाबतही बोलणी सुरू आहेत. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान महायुतीचे जागावाटप जाहीर केले जाईल आणि लगेच केंद्राकडे उमेदवारांच्या नावांची यादीही पाठवली जाईल. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीत सहसंवाद साधणारी व्यक्ती उरलेली नाही हे खरे आहे. पण या परिस्थितीवर भाजप व शिवसेना नेते मार्ग काढत आहेत. आम्ही स्वत: नुकसान सहन करू, पण कुणालाही बाहेर पडण्याची वेळ येणार नाही.’’
‘भाजपच्या पक्षप्रवेशासाठी अनेक मातब्बर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत, परंतु येणाऱ्या व्यक्तीस जनतेत विश्वासार्हता नसेल तर प्रवेश न देण्याचे पक्षाचे धोरण आहे,’ असेही तावडे यांनी सांगितले. पुण्यात निवडून येतील असेच उमेदवार देऊ असेही ते म्हणाले.