स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे सोमवारी पुण्यात काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत एक विचित्र घटना घडली. या यात्रेत गर्दीत चालत असताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना धक्का लागला. संतापलेल्या तावडे यांनी स्थानिक माजी नगरसेविकेला सर्वांसमक्ष झापल्याचा प्रकार घडला. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे : प्रशांत जगताप यांना पक्ष नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
या यात्रेत राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. या यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही यात्रा चालत गरवारे पुलाजवळ आली असताना गर्दीत तावडे यांना धक्का लागला. तावडे यांच्या बाजूने भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका चालत होत्या. मात्र गर्दीत धक्का लागल्याने संतापलेल्या तावडे यांनी मुलाहिजा न बाळगता सर्वांसमक्ष त्या नगरसेविकेला झापले. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा या यात्रेत जाहीर अपमान झाला. तावडे यांचा आवेश पाहून या यात्रेतील सहभागी अक्षरशः अवाक् झाले