भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची निवड झाल्यानंतर यापूर्वीचे अध्यक्ष एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचंड आकांडतांडव करत रान पेटवलेले असताना पुण्यात होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या तोंडावर विघ्न नको म्हणून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरात येऊन तावडे दोन्ही गटांशी चर्चा करणार आहेत.
ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या खाडेंची निवड होताच पक्षातील एका गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खाडे निष्क्रिय असून त्यांची शहराध्यक्ष होण्याची योग्यता नाही, असे सांगत त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी पक्षाच्या २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुण्यात होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांना जाब विचारू, काळे झेंडे दाखवू वेळप्रसंगी मुंडन करून घेऊ, असे इशारे या गटाने दिले. त्याची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतली. खाडे तसेच पवार गटातील कार्यकर्त्यांना त्यांनी मुंबईत बोलावून घेतले. खाडे यांच्यासमवेत मोहन कदम, रघुनंदन घुले होते. तर, एकनाथ पवार, प्रमोद निसळ, नामदेव ढाके, रामकृष्ण राणे, प्रमोद ताम्हणकर आदी होते. फडणवीस यांनी दोहोंशी स्वतंत्रपणे चर्चा केली. पवार गटाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. तर, खाडे यांना सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची सूचना केली. तावडे दोन्ही बाजू समजावून घेतील व त्याचा अहवाल प्रदेशाला सादर करतील, असे स्पष्ट केले.

Story img Loader