निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजकीय नेत्यांच्या पुणे भेटी वाढणार आहेत. विमानतळावर नेते उतरले, की त्यांना वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेने तत्परता दाखविली आहे. विमानतळ ते वेकफिल्ड चौक या ‘व्हीआयपी’ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याचे ठरविले आहे. नेत्यांची काळजी घेणाऱ्या महापालिकेला सामान्य पुणेकर हे कररूपाने पैसे देतात. त्या करातून रस्ते होतात; याची आठवण असावी. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याने मुरुम, डांबर टाकून केलेली तात्पुरती मलमपट्टीही दिसत असावी. त्या खड्ड्यांतून रस्ता शोधावा लागतो, हे कटू सत्यही ज्ञात असावे. ‘व्हीआयपीं’साठी तातडीने सुविधा देण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही; पण स्वत:च्या खिशातून कर देणाऱ्या सामान्य पुणेकरांनी ‘व्हीआयपी’ रस्ते मिळण्याची अपेक्षा करायला नको का?
सामान्य नागरिकांचा वाहतुकीच्या कोंडीत जीव घुसमटतो. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्याकडे पाहायला महापालिकेला वेळ नाही. सध्या तर निवडणुकीचा काळ असल्याने राजकीय नेत्यांची पुण्यात सतत ये-जा सुरू राहणार आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे होणार असल्याने विमानतळावर उतरल्यावर पुण्यात सभेच्या किंवा प्रचाराच्या ठिकाणी वेळेत जाण्यासाठी राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. त्यांच्या या धावपळीत अरुंद रस्त्याचा अडसर होत असल्याने महापालिका प्रशासनाला कळवळा आला. त्यांना होणारा हा त्रास ताबडतोब दूर करण्यासाठी विमानतळ ते वेकफिल्ड चौक या ‘व्हीआयपी’ रस्त्याचे तातडीने रुंदीकरण केले जाणार आाहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगीचे सोपस्कार लगेच पूर्ण करून आता हा रस्ता सहाऐवजी १२ मीटरचा होणार आहे. प्रत्यक्ष रुंदीकरणाचे कामही लगेच हाती घेतले जाणार आहे. ही चांगली बाब आहे. पण पुण्यातील अन्य रस्त्यांकडे महापालिका प्रशासनाने पाहण्याचीही वेळ आली आहे.
हेही वाचा >>> ”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
पुण्यातील रस्ते आणि त्यामुळे होणारी गर्दी या विषयी ‘टॉम टॉम २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये जगातील सर्वाधिक दाटीवाटीचे आणि लहान रस्ते असल्याच्या शहरांच्या यादीत पुण्याने सातवे स्थान पटकाविले आहे. ही पुण्याची आणखी एक नवी ओळख जागतिक पातळीवर झाली आहे. सायकलींचे शहर, विद्योचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानीपासूनचा प्रवास हा आता सर्वांत दाटीवाटीचे आणि लहान रस्ते असलेले शहर यापर्यंत पोहोचला आहे. ५५ देशांमधील ३८७ शहरांमधील रस्त्यांची पाहणी करून हा अहवाल तयार झाला. त्यामध्ये लंडन हे सर्वाधिक गर्दीचे शहर असल्याचे आढळून आले. दहा किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी सरासरी किती वेळ लागतो, याचा अभ्यास करण्यात आला असता, पुण्यात १० किलोमीटरसाठी यापूर्वी सरासरी २७ मिनिटे आणि ५० सेकंद लागत होते आता त्यामध्ये वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व अरुंद रस्त्यांमुळे झाल्याने पुणे हे सर्वाधिक दाटीवाटी असलेल्या रस्त्यांमध्ये सातव्या स्थानावर पोहोचले. पुण्याचा हा नावलौकिक वाढविण्यात महापालिकेने हातभार लावल्याने पुण्याची अशी नवी ओळख झाली आहे.
हेही वाचा >>> धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
गेल्या दोन वर्षांपासून पुण्यावर प्रशासक राज आहे. महापालिका आयुक्तांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. तो पाहिल्यावर प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना दाद द्यावी लागते. ११ हजार ६०१ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये पथ विभागासाठी एक हजार २७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी, नवीन पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी ‘ मिसिंग लिंक डेव्हलपमेंट’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार अस्तित्वातील डीपी रस्त्यांना जोडणारी मिसिंग लिंक विकसित करून मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यानुसार पर्यायी वाहतुकीसाठी ३३ मिसिंग लिंक विकसित करण्याची ही योजना आहे. ही प्रत्यक्षात योजना अवतरेल, तो पुणेकरांचा सुदिन म्हणावा लागेल.
शहराच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. ते खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडे येरवडा येथे एकच हॉटमिक्स प्लॅट आहे. यंदा हा हॉटमिक्स प्रकल्प काही काळ बंद पडला होता. त्यामुळे महापालिकेने पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. आता ते पेव्हर ब्लॉक धोकादायक पद्धतीने रस्त्यांवर दिसतात. त्यामुळे अपघात होऊ लागले आहेत. अर्थसंकल्पात महापालिकेने आणखी एक हॉटमिक्स प्लांट उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. पुण्यात नवीन गावे समाविष्ट झाल्याने पुण्याचे क्षेत्रफळ मुंबईपेक्षाही वाढत असताना हा आणखी एका हॉटमिक्स प्लांटची गरज महापालिकेला आजवर वाटली नाही.
रस्ता रुंदीकरणामध्ये जात असलेल्या वृक्षांचे पुनर्वसन तसेच रस्त्यांच्याकडेला झाडे लावणे यासाठी स्वतंत्र विभाग आता सुरू केला जाणार आहे. मात्र, रुंदीकरणाची कामे ही एवढी संथगतीने चालू असताना या विभागाच्या कामाला गती कधी मिळणार, असा प्रश्न उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय नेत्यांची अडचण सोडविण्यात तत्परता दाखविणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता ‘व्हीआयपी’ रस्त्याप्रमाणे सामान्य रस्ते ‘व्हीआयपी’सारखे करावे, हीच पुणेकरांची माफक अपेक्षा!