पुणे : दिवाळीत फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्यामुळे श्वसन समस्यांसोबतच मुलांमध्ये विषाणुजन्य तापाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खोकला, सर्दी, ताप, उलट्या होणे अशा सामान्य तक्रारी आढळून येत आहेत. त्यामुळे लक्षणे दिसून आल्यास मुलांवर तातडीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अनेकदा आरोग्याच्या विविध समस्या सतावतात. फटाक्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रदूषकांच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यानंतर मुलांना दमा अथवा श्वसनाच्या इतर समस्यांचा त्रास उद्भवू शकतो. मोठा आवाज आणि प्रखर प्रकाशाने डोकेदुखी, मानसिक ताण आणि झोपेसंबंधीचा त्रास होऊ शकतो. दिवाळीनंतर लगेचच विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली.

हेही वाचा – भाजप नव्हे, ‘भारता’साठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची – फडणवीस यांचे वक्तव्य

दिवाळीनंतरच्या कालावधीत पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ब्राँकायटिस दिसून येत आहे. प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. फटाक्यांमधून प्रदूषित हवा आणि घातक कणांच्या संयोगाने श्वसन विकार उद्भवतात. पालकांनी त्यांची मुले सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करणे, तसेच धूळ, परागकण, प्राण्यांचे केस किंवा श्वसनाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले.

हेही वाचा – टोमॅटो ६० रुपयांवर; भाज्याही महाग, दर ८० रुपयांपर्यंत

मिठाईचे अतिसेवनही अपायकारक

सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि तळलेले फराळाचे पदार्थ उपलब्ध असल्याने मुले त्यांचे अतिसेवन करतात. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढते आणि दात किडतात. तसेच भविष्यात मधुमेहासारखी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral fever infection in children after diwali pune print news stj 05 ssb