लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मतदारांच्या मतदार यादीतील नावावर वगळले गेले असल्यास संबंधितांना मतदान करता येईल, असा एक संदेश समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित (व्हायरल) होत आहे. मात्र, हा संदेश चुकीचा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा संदेश व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली. मतदानाबाबत चुकीचा संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असा दिशाभूल करणारा संदेश संबंधित व्यक्तीने समाजमाध्यमाद्वारे पसरविला. अशा संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक, प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. या संदेशामुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

आणखी वाचा-प्रचाराचा शेवटचा दिवस पावसात धुवून निघणार? हवामानाचा अंदाज काय?

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेले वर्षभर काम करण्यात आले. त्यानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. मतदाराचे नाव वगळताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे समाजमाध्यमातील संदेशाद्वारे प्रसारीत केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे स्पष्ट करुन संबंधित व्यक्तीला याबाबत २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रसारित संदेशात काय?

मतदार यादीतून नावे वगळलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून अर्ज क्र. १७ भरावा. असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतील. त्यामुळे ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रीया करावी, असा संदेश मोबाइलवरून देण्यात येत आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

आणखी वाचा-पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील

मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही

मतदार यादीत नाव नसेल, तर संबंधित नागरिकांना मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral message on social media about voting is wrong clarification by administration pune print news psg 17 mrj