प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेकडून डिझेल बसला पर्याय म्हणून शहरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, ही केवळ धुळफेक असल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहेत. कारण, एका इलेक्ट्रिक बसची चार्जिंग चक्क डिझेलच्या इंजिनाद्वारे केली जात असल्याचे या व्हिडिओतून उघड झाले आहे. त्यामुळे सरकारच्या आणि महापालिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडिओ पीएमपीएमएलच्या एका डेपोतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्जिंग पाँईंटला डिझेलच्या जनरेटरद्वारे निघालेल्या केबल जोडण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियातून फिरत असून पुणेकरही या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, या बसवरील हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटवर कोणताही क्रमांक दिसत नसल्याने ही बस अद्याप सेवेत दाखल झाली नसावी असे दिसते. मात्र, या व्हिडिओमुळे शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

या व्हडिओबाबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीकडून पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video diesel generator used for charging batteries of electric bus in pune aau
Show comments