सध्या संपूर्ण देशावर करोनाचं सावट पसरलेलं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहराने वाढत्या रुग्णसंख्येच्या निकषात मुंबईलाही मागे टाकलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे शहरात परत लॉकडाउन घोषित करण्यात आलं. आतापर्यंत अनेकांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत करोनावर मात करुन बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ होते आहे. आजुबाजूचं वातावरण निराशाजनक असेल तर साहजिकच रुग्णावरही त्याचा परिणाम होतो असं म्हणतात. मात्र पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपूते या तरुणनी या खडतर काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरण घालून दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलोनीच्या घरातील ५ जणांना करोनाची लागण झाली होती. एकट्या सलोनीचा अहवाल निगेटीव्ह आला. महत्वाची गोष्ट म्हणजे पाचही जणं करोनावर मात करुन घरी परतले. नुकतीच सलोनीची बहिण स्नेहल करोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने, हट जा रे छोकरे….गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलं. सलोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आजुबाजूला गंभीर वातावरण असतानाही सकारात्मक आणि हसतमुखाने संकटाचा सामना करणाऱ्या सलोनीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

या व्हिडीओत उपचार घेऊन घरी परतणारी सलोनीची बहिणही तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. घरी परतल्यानंतर सलोनीच्या आईने औक्षण करत तिचं स्वागत केलं. दरम्यान पुण्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्रशासनाने महाविद्यालयातील हॉस्टेलचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करायला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video pune girl dance on bollywood dance number as her sister came home after fighting covid 19 svk 88 psd