विशाखा समित्या आहेत, पण कागदोपत्रीच. संस्थाचालक, प्राचार्य, विविध संघटना यांच्या दबावामुळे तक्रारच नोंदवून घेतली जात नाही. तक्रार नोंदवायला गेलेल्या महिलेलाच बदनामीची धमकी दिली जाते. काही ठिकाणी समितीचे सदस्य हे पुरूष आहेत.. ही गाऱ्हाणी आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील महिला शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांची. होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्यासाठी अद्यापही अनेक महाविद्यालयांमध्ये महिलांसाठी हक्काची जागा नाही
कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा समिती असावी, असा नियम आहे. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अद्यापही विशाखा समिती स्थापनच करण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पुण्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नसली, तरी बहुतेक महाविद्यालयांमध्ये अशीच अवस्था आहे. काही महाविद्यालयांमध्ये समित्या स्थापन केल्या आहेत, मात्र त्या कागदावरच आहेत. दरवर्षी महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणून विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूदही करते. मात्र, प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टींची तक्रार करण्यासाठी महिला शिक्षिकांना आजही महाविद्यालयांमध्ये हक्काची जागा नाही. एका महिला कर्मचाऱ्याला प्राचार्याकडून झालेल्या त्रासाच्या वृत्तानंतर अनेक महिला कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’कडे आपले म्हणणे मांडले आहे. कोथरूड, हडपसर, जेजुरी, आंबेगाव या पुण्याजवळील ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांबरोबर नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील महिलांनीही आपले म्हणणे मांडले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महाविद्यालयांच्या पातळीवर एखादी समिती किंवा एखाद्या शिक्षिकेची नेमणूक करण्यात येते. मात्र, महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत महाविद्यालये गंभीर दिसत नाहीत. महाविद्यालयांमध्ये काही वेळा सहकाऱ्यांकडून वाईट अनुभव येत असल्याचे शिक्षिकांनी सांगितले. काही ठिकाणी तक्रार निवारण समिती आहे. पण त्याचे प्रमुखपद पुरुष सहकाऱ्यांकडे आहे. हिमतीने पुढे येऊन तक्रार केल्यास, ती नोंदवूनच घेतली जात नाही. ‘शाब्दिक शेरेबाजी’ चे पुरावे सादर करा, नंतरच तक्रार दाखल करू असे उत्तर एका महाविद्यालयात महिलेला मिळाले आहे. प्राचार्य किंवा उपप्राचार्याबाबत तक्रार असल्यास त्यांना संस्थाचालक पाठीशी घालतात. पदोन्नतीच्या काळात किंवा बदलीच्या काळात अनेकींना सहकारी, संस्थाचालक किंवा अगदी प्राचार्याकडूनही वाईट अनुभव येतात. ‘बहुतेक वेळा होणारा त्रास हा मानसिक असतो. माझ्याकडे समोरचा कोणत्या उद्देशाने बघतो आहे, हे कळत असते. त्याचा त्रास होत असतो. असुरक्षित वाटत असते. मात्र, त्याचा पुरावा देता येत नसल्यामुळे तक्रार करता येत नाही,’ असे एका महिला प्राध्यापकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

‘‘प्रत्येक महाविद्यालय, शाळा या सर्व ठिकाणी विशाखा समिती असलीच पाहिजे. त्याबाबत उच्च-तंत्र शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाने सूचना दिलेल्या आहेतच. मात्र, त्याचवेळी महिलांनीही होणाऱ्या अन्यायाबाबत पुढे येऊन बोलले पाहिजे, तरच हा प्रश्न सुटू शकतो. महाविद्यालयांत समिती नसेल, अथवा ती काम करत नसेल तर विद्यापीठाकडे वेळप्रसंगी पोलिसांकडेही तक्रार केली पाहिजे.’’
– नीलम गोऱ्हे, विशाखा समिती प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा