स्वत:ला विष्णूचा अवतार म्हणवून घेण्यात धन्यता माणणाऱ्या प्रधानसेवकाचा प्रभाव आता संपला आहे. मागील साडेचार वर्षांत देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला असून आपले अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर पातळी सोडून टीका करीत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व व प्रधानसेवक करीत असल्याचा टोला कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लगावला.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने रविवारपासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत थेरगाव येथे अभियानाचा शुभारंभ प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, ज्यांना मनमोहनसिंग सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा रुचल्या नाहीत. त्या भांडवलदारांनी सूड भावनेने काँग्रेस विरोधात काम केले. भाजपाने काँग्रेसची खोटी बदनामी करून सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसताना अनेक आरोप भाजपाने केले. खोटी आश्वासने देऊन मिळविलेली सत्ता टिकवण्यासाठी भाजपा वाटेल त्या थराला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे इव्हीएम मशीनचे वृत्त सर्वांनी पाहिले आहे. ही मंडळी देश विकायला निघाली आहेत. त्यांच्या तावडीतून देश मुक्त करावा असे आवाहनही महाजन यांनी नागरिकांना केले. काँग्रेसच्या विधवेने विधवा महिलांचे अनुदान खाल्ले अशी देशातील महिला भगिनींचा अपमान करणारी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान निवडणूक प्रचारात वापरली. अशी गावगुंडांची भाषा पंतप्रधानांनी वापरावी हे दुर्दैव असल्याचेही महाजन म्हणाले.