टाटा मोटर्स कामगार संघटनेच्या त्रवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गुरूवारी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, अध्यक्षपदी सतीश ढमाले यांची, कार्याध्यक्षपदी सुरेश जमाले यांची तर सरचिटणीसपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली.
संपूर्ण कामगार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत विष्णू नेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. नेवाळे, सुभाष हुलावळे, बबन चव्हाण या विद्यमान पदाधिकाऱ्यांसह ४० सदस्य निवडून आले आहेत. नवनिर्वाचित सदस्यांमधून नव्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी गुरूवारी झालेल्या सभेत अध्यक्षपदी ढमाले, कार्याध्यक्षपदी जमाले तसेच सरचिटणीसपदी ढाके यांची वर्णी लावण्यात आली. नेवाळे यांनी स्वत: पद न घेता समर्थकांना संधी देण्याची भूमिका घेतली. लवकरच कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असून त्यामध्ये १५ जणांचा समावेश राहणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर कामगारांनी जल्लोष केला.