पुणे : नुकत्याच झालेल्या विश्व मराठी संमेलनातील पुस्तक आदान-प्रदान या अनोख्या उपक्रमाला पुणेकर पुस्तकप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला आहे. तीनच दिवसांत सुमारे ३५ हजार पुस्तकांचे आदान-प्रदान करण्यात आले. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शन या शिवाय पुस्तक आदान प्रदान हा उपक्रमही समाविष्ट करण्यात आला होता. डोंबिवली येथील फ्रेंड्स पै लायब्ररीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

‘गेली ३८ वर्षे फ्रेंड्स पै लायब्ररी कार्यरत आहे. या ग्रंथालयामध्ये सुमारे साडेचार लाख पुस्तके आहेत. या ग्रंथालयाद्वारे गेली आठ वर्षे डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान-प्रदान हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी जानेवारीमध्ये हा उपक्रम राबवला जातो. त्यात वाचलेली पुस्तके देऊन त्या बदल्यात अन्य पुस्तके घेता येतात. दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमात बहुभाषिक पुस्तकांचे आदान-प्रदान करण्यात येते. त्यात इंग्रजी भाषेतील पुस्तकांची संख्या जास्त असते. उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हा उपक्रम पाहिल्यावर विश्व संमेलनात त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता’, अशी माहिती फ्रेंड्स पै लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले.

विश्व मराठी संमेलनात झालेल्या पुस्तक आदान प्रदान उपक्रमात केवळ मराठी भाषेतील पुस्तकांचे आदान प्रदान करण्यात आले. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत सुमारे ३५ हजार पुस्तकांचे आदान प्रदान झाले. पुणेकर वाचकांकडून मिळालेला प्रतिसात अनपेक्षित होता. खूप वाचक उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आले होते. या उपक्रमात वाचकांनी त्यांच्याकडे असलेली पुस्तके देऊन उपलब्ध पुस्तकांतून त्यांच्या पसंतीची पुस्तके घेतली. आदान प्रदान उपक्रमातून जमा झालेली पुस्तके वर्षभर जपून ठेवावी लागतात. त्यासाठी जागा भाड्याने घेण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी पुस्तक हाताळणी शुल्क म्हणून दहा रुपये आकारण्यात आले होते, असे पै यांनी सांगितले.

Story img Loader