काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची आणि गाठीभेटींची सुरुवात झाली असून त्यांनी शनिवारी एमआयटी आणि कोथरूड येथील शिवराय प्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये जाऊन महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीने कदम यांचे स्वागत महाविद्यायीन युवकांनी केले.
कॅम्पसमधील उपाहारगृहात कदम पोहोचल्यानंतर तेथे युवक-युवतींची मोठी गर्दी झाली. नव्यानेच मतदार झालेले आणि यावेळी प्रथमच मतदानात भाग घेणारे युवक यावेळी कदम यांच्याबरोबर मोकळेपणाने संवाद करत होते. शैक्षणिक समस्यांपासून ते पुण्याच्या विकासापर्यंत अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. पक्षाच्या पाठीशी युवाशक्ती उभी करा, असे आवाहन यांनी उपस्थितांना केले. यानंतरच्या टप्प्यातही सोमवार आणि मंगळवारी (२४, २५ मार्च) सकाळी विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन कदम युवकांशी संवाद साधणार आहेत.
पदयात्रांना आजपासून सुरुवात
काँग्रेसतर्फे रविवार (२३ मार्च) पासून पदयात्रांचे आयोजन करण्यात येत असून पहिली पदयात्रा भवानी माता मंदिरापासून असल्याची माहिती शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ही पदयात्रा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून फिरेल. त्यानंतर सायंकाळी चार ते सात या वेळेत पर्वती मतदारसंघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसचे सहा प्रवक्ते
काँग्रेसने पुण्याच्या निवडणुकीसाठी सहाजणांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. सतीश देसाई, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर आणि विकास देशपांडे हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील.
महाविद्यालयांमध्ये जाऊन विश्वजित कदम यांचा संवाद
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची आणि गाठीभेटींची सुरुवात झाली असून त्यांनी शनिवारी एमआयटी आणि कोथरूड येथील शिवराय प्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये जाऊन महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधला.
First published on: 23-03-2014 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwajeet kadam dialog in college