‘‘मी अण्णांसोबतच आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून (आप) चळवळ हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय फायदा उठवण्यासाठी असे प्रयत्न झाले तरी ते सफल होऊ देणार नाही,’’ असे अण्णांचे सहकारी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चौधरी हे अण्णा हजारे यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या गुरुवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘आप’वर थेट आरोप केला. ‘‘सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या लोकपाल विधेयकात अण्णांचे ७५ टक्के मुद्दे आहेत. आता निवडणुकीचे वारे असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे अण्णांनी हे विधेयक स्वीकारावे. उरलेल्या गोष्टींबाबत नंतर सुधारणा करता येतील, असे आपले मत आहे. याबाबत मी, मेधा पाटकर आणि किरण बेदी यांनी अण्णांना आताचे विधेयक येऊ देण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, ‘आप’कडून हे विधेयक न स्वीकारण्याबाबत अण्णांना सल्ला दिला जात आहे. याबाबत राळेगण-सिद्धी येथे आलेले ‘आप’चे प्रतिनिधी कुमार विश्वास यांनी भाषणात तसे सुचवले. ‘आप’ला लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हा मुद्दा भिजत ठेवायचा आहे. कारण लोकपाल विधेयक मंजूर झाले तर त्यांच्याकडे मुद्दाच राहणार नाही. याला आमचा विरोध आहे. त्यामुळे यंदा आम्ही आंदोलन ‘हायजॅक’ होऊ देणार नाही,’’ असे चौधरी म्हणाले.
‘‘राळेगण येथे अण्णांच्या आंदोलनाच्या ठिकाणी कुमार विश्वास आले. या व्यासपीठावरून कोणत्याही राजकीय व्यक्तीने भाषण करू नये, असे ठरलेले आहे. मात्र, अण्णांनी त्यांना बोलू देण्यास सांगितले. मात्र, राजकीय भाष्य न करण्याबाबत खडसावून सांगा, असे मला सांगितले होते. कुमार विश्वास यांनी तसे सांगितल्यानंतरही त्यांनी राजकीय वक्तव्ये केली. याबाबत मी नाराजी व्यक्त केली. यानंतर मी अण्णांना सांगून नगर येथे कार्यक्रमासाठी गेलो होतो. उद्या पुन्हा राळेगण येथे जाणार आहे. मी चळवळीतील माणूस आहे, अण्णांवर नाराज होण्याचा प्रश्नच नाही,’’ असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा