संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही. संविधानात भारतीयत्वाच्या सांस्कृतिक सौंदर्याच्या खुणा आहेत. श्रद्धा जोपासण्याचे स्वातंत्र्य जसे व्यक्तिगत हक्कांचा भाग आहे, तसेच स्वतःला अमान्य असणाऱ्या श्रद्धा नाकारण्याचे स्वातंत्र्यही मान्य झाले पाहिजे,” असे मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी (१९ डिसेंबर) बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांचे संघटन असलेल्या ब्राईट्स सोसायटी तर्फे आयोजित राष्ट्रीय नास्तिक परिषदेच्या समारोप प्रसंगी पुण्यात बोलत होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सच्या सभागृहात ही नास्तिक परिषद पार पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वंभर चौधरी म्हणाले, “नास्तिक ईश्वरावर, धर्मावर सतत टीका करत असले तरी धर्मचिकित्सा मात्र तितके गंभीरपणे करतांना दिसत नाही. बहुतेक धर्मांधांचा धार्मिक अभिनिवेश हा त्यांना त्यांच्या धर्माच्या असलेल्या अज्ञानातून येतो. गंभीर धर्मचिकित्सा केल्यास धर्मातील परस्पर विसंगती पुढे आणता येतात.”

“गांधी, विनोबा यांचा मार्ग किंवा वारकरी परंपरा हेही सुधारणावादी प्रवाहच”

“नास्तिक स्वतः धर्मापासून मुक्त होऊ शकत असले, तरी आजूबाजूच्या समाजासाठी ते नेहमीच शक्य नसते. अशावेळी गांधी, विनोबा यांचा मार्ग किंवा वारकरी परंपरा हेदेखील सुधारणावादी प्रवाहच आहेत हे लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे,” असे डॉ. चौधरी यांनी म्हटले.

“कट्टर धर्मियांनी धर्मपालनाला कर्मकांडाशी जोडले”

या कार्यक्रमात बोलताना संविधान अभ्यासक ॲड.असीम सरोदे म्हणाले, “कट्टरवादी हिंदूंनी, कट्टर मुस्लिमांनी व इतर कट्टर धर्मियांनी धर्मपालनाला कर्मकांडाशी जोडले आणि कर्मकांडांच्या दिखाऊपणाला राजकारणाशी जोडून धर्मतिरेक वाढवला. देव-धर्म कलुषित करून निर्बुध्दता जोपासली. विचार केला, तर जीवनात शुद्धता आणणे अजूनही शक्य आहे. साधनेचे सात्विकिकरण करण्यातून सुबुद्धता येईल आणि तेव्हाच इतरांच्या मतांचा आदर करण्याची परंपरा तयार होईल.”

“पोलिसांनाच न्यायाधीश होऊ देणारी प्रक्रिया बंद झाली पाहिजे”

“वैज्ञानिक दृष्टिकोन जरी मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे तरी वागणुकीच्या पातळीवर आणल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय समाजाच्या कायदेशीर जबाबदारीचा भाग होणार नाही. धार्मिक भावना दुखावल्या या कारणाखाली दाखल होणारे अनेक गुन्हे खोटे असतात व पोलिसांनाच न्यायाधीश होऊ देणारी प्रक्रिया बंद झाली पाहिजे. संविधानातील कलम २५(१)नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देव ही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मत स्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमाची सुरुवात अविनाश पाटील यांच्या भाषणाने झाली , इतर समविचारी चळवळींशी जुळवून घेऊन आपली संघटनशक्ती वाढवावी असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी ईशनिंदा कायद्याची कालबाह्यता ठळकपणे मांडली. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधान यांच्यातील भ्रातृभाव विशद केला. नरेंद्र नायक यांनी भारतातील इतर बुद्धिप्रामाण्यवादी संघटनांचे कार्य कसे चालते याची आणि ईश्वरकल्पनेची चिकित्सा केली.

अलका धुपकर यांनी लोकशाहीला आणि विवेकाला धर्मांध संघटनांचा कसा विरोध आहे याबद्दल मत मांडले. पत्रकार प्रसन्न जोशी यानी नास्तिकांनी इतर समाजघटकांशी संवाद वाढवण्याबद्दल मार्दर्शन केले.

पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषण काठमांडूहून आलेले ‘ह्यूमनिस्ट्स् इंटरनॅशनल’चे उत्तम निरौला यांनी केले. विचारवंत आणि विवेकवादी लोकांना होणाऱ्या त्रासाविरोधात जागतिक पातळीवर आवाज उठवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित श्रोते यांच्यात चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली. प्रामुख्याने शास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांनी सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला.

ब्राईट्स संघटना काय आहे?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राइटस् सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. २०१४ पासून ब्राइट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश असतो. ब्राइट्स सोसायटीने मराठीत एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.

राष्ट्रीय नास्तिक परिषद, पुणे (छायाचित्र सौजन्य – डॉ. कुमार नागे)

या कार्यक्रमात नरेंद्र नायक (अध्यक्ष, फिरा) आणि अलका धुपकर (पत्रकार) यांना त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी योगदानासाठी चार्वाक पुरस्काराने गौरविण्यात आले. या परिषदेसाठी महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यातून अनेक तसेच देशाबाहेरूनही काही कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उत्तम निरुला (ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल), अनिकेत सुळे (होमी भाभा सेंटर फॉर रिसर्च), अविनाश पाटील ( महा. अंनिस), ॲड.असीम सरोदे (संविधान अभ्यासक), विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी), प्रमोद सहस्त्रबुद्धे(अध्यक्ष, ब्राईट्स सोसायटी) उपस्थित होते.

हेही वाचा : “जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह, कारण…”, डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देत माजी न्यायमूर्ती हेमंत गोखलेंचं विधान

परिषदेच्या शेवटी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी गुणवंत सदस्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. याप्रसंगी ब्राइट्स सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष शिवप्रसाद महाजन, सचिव कुमार नागे, सहसचिव निखिल जोशी, कोअर कमिटीचे सदस्य, ब्राइट्स सोसायटीचे सदस्य, हितचिंतक, तसेच समविचारी लोक उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwambhar chaudhari comment on indian constitution in atheist conference pune pbs